Khandoli chi Bhaji
मराठवाडा म्हणजे खाण्यासाठी खास आणि त्यात खांडोळीची भाजी सुटलनं तोंडाला पाणी. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मराठवाड्यातील खास रेसिपी घेऊन आलो आहे, ती म्हणजे खांडोळीची भाजी. चला तर मग जाणून घेऊ कशी बनवतात झणझणीत आणि चवदार खांडोळीची भाजी.
खांडोळीची भाजी बनविण्याची रेसिपी – Khandoli Bhaji Recipe in Marathi
खांडोळीची भाजीसाठी बनवण्यासाठी लागणारी सामग्री – Ingredients of Khandoli Bhaji
- आठ मध्यम कांदे
- तीन वाट्या किसलेलं खोबर
- अर्धी वाटी खसखस
- एक वाटी हरभरा डाळ
- एक वाटी शेंगदाणे
- एक पाव तेल
- एक चमचा हळद
- लाल तिखट (आवश्यकतेनुसार)
- हिरव्या मिरच्या
- आलं-लसूण पेस्ट
- तीन वाट्या बेसन
- `मीठ (चवीप्रमाणे)
खांडोळीची भाजीसाठी बनविण्याची विधी – Khandoli Bhaji Recipe
रस्सा कसा बनवावा:
एक वाटी खोबरं, शेंगदाणे, चार कांदे चिरून, सहा हिरव्या मिरच्या, दोन चमचे खसखस घालून हे सर्व पदार्थ थोड्या तेलात भाजून वेगवेगळे बारीक वाटावेत. कढईत थोडं तेल टाकून, मोहरी तडतडल्यावर बारीक केलेला पदार्थ टाकून ढवळावा.
तेल सुटत आल्यावर, किंचित हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा धनेपूड टाकून मिश्रण चांगलं ढवळावं. हळूहळू उकळीचं पाणी टाकावं. पाणी टाकून पाहिजे तेवढा रस्सा पातळ किंवा घट्ट करावा. एक-दोन उकळ्या आल्या की वरून मीठ आणि कोथिंबीर टाकावी.
सारण कस बनवावं:
आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली हरभरा डाळ, शेंगदाणे, खसखस, खोबर. हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून एकजीव करावेत. कढईत थोडं तेल टाकून आधी त्यात मोहरी तडतडू द्यावी. नंतर आलं – लसूण पेस्ट घालावी. कांदे बारीक कापून कढईत टाकावेत. ते खरपूस झाले की त्यात किंचित हळद, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धनेपूड, मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व जिन्नस टाकून मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं वरचेवर मोकळं होईपर्यंत ढवळावं. गॅस बंद करून सर्व मिश्रण मोठ्या भांड्यात ओतावं.
वरून भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालावी. मिश्रण एकदम थंडगार होऊ द्यावं.
पारी कशी बनवावी:
तीन वाट्या बेसन, मीठ आणि किंचित हळद घालून पाण्यानं घट्ट भिजवावी. पातळ पुरी लाटून त्यावर गार झालेलं मिश्रण दाबून त्याला करंजी सारखा आकार देऊन. (तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता.) पुरीच्या कडा दुमडण्यापूर्वी पुरीच्या आतल्या भागाच्या कडेला पाण्याचं बोट लावून, व्यवस्थित दुमडाव्या. खांडोळी तयार होते.
अशाप्रकारे सर्व खांडोळ्या तयार कराव्या. सर्व खांडोळ्या तळून घ्याव्यात. तळलेल्या खांडोळ्या रस्सा उकळत असताना त्यात टाकता येतात किंवा कुकरमध्ये/चाळणीत वाफवून ही घेता येतात.
झाली आपली खांडोळीची भाजी तयार. गरम रस्सा सोबत ह्या खांडोळ्या खूप छान लागतात.
चला तर लगेच बनवा आणि आपले अभिप्राय आमच्या या माझी मराठी वेबसाईट वर कमेंट च्या माध्यमातून आ म्हाला नक्की कळवा,
धन्यवाद!