Morning Habits
मित्रानो ज्याची सकाळ चांगली त्याचा पूर्ण दिवस चांगला… त्यामुळे नेहमी आपल्या दिवसाची सुरुवात चांगली कशी होईल याकरता आपण सतत जागरूक असायलाच हवं. आणि याकरता आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टींचा संचार होण्याकरता आपण त्या दृष्टीने पाऊलं उचलायला नकोत का?
रोजचा दिनक्रम जगताना आपण आपल्या आयुष्याला कितीतरी नको असलेल्या सवयी लाऊन ठेवलेल्या आहेत याचा साधा विचार देखील आपल्या मनात येत नाही.
आणि कालांतराने या सवयींचं ओझं व्हायला लागतं, पण त्या सवयीच्या आपण इतके आधीन झालो असतो कि सोडवायच्या म्हंटल्या तरी सोडता येत नाहीत.
आजच्या या लेखातून आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम रीतीनं कशी करायची याबाबत काही महत्वपूर्ण टिप्स सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम – Morning Habits to Start the Day Right

लिंबू पाण्याने करा दिवसाची सुरुवात:
हा प्रयोग आपल्यापैकी बरीच मंडळी करत असतील. आपल्या दिवसाची सुरुवात गरम लिंबू पाण्याने करायला काहीच हरकत नाही. कारण रात्रभरात जे विषारी Toxins आपल्या शरीरात तयार होतात त्यांना बाहेर काढण्याचा हा एक सगळ्यात चांगला उपाय आहे.
आपल्या शरीरासाठी व्हिटामिन सी हा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे आपला श्वास ताजातवाना होतो, वजन कमी होण्यास मदत होते, चयापचय सुरळीत होऊन पचनक्रिया व्यवस्थित होते. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी आणि रिफ्रेश करण्याकरता सगळ्यात आधी गरम लिंबू पाणी.
तणावातून बाहेर पडा:
रात्रभर झोपेच्या आधीन सोपविलेले आपले शरीर ताणलेल्या अवस्थेत असते. सकाळी लवकर उठण्याची स्वतःला सवय लावा, आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहावे असे वाटत असल्यास फिरायला (वेगाने) किंवा शक्य असल्यास धावायला बाहेर पडा. यामुळे होईल काय? तर दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं सुरु होईल…रात्रभर ताणलेले शरीर दिवसभर कार्य करण्याकरता तयार होईल आणि तुम्ही पूर्ण दिवस स्वतःला Fresh आणि Active Feel कराल.
व्यायाम करा:
तुम्हाला ज्या पद्धतीचा व्यायाम आवडतो उदा. जीम ला जाणे, सूर्यनमस्कार घालणे, योगा, ध्यान, प्राणायाम, असा तुम्हाला आवडणारा कोणताही व्यायाम करा पण तुमच्या शरीराला व्यायामाची सवय अवश्य लावा कारण संपूर्ण दिवसाकरता लागणारी energy या व्यायामातून मिळणार आहे. व्यायामाने शरीर सुदृढ रहातं.
गुंतागुंतीचा आणि फार वेळ चालणारा व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. फक्त नियमित करा आणि ठरवलेल्या वेळीच करा.
Fresh सकाळ हवीये त्याकरता रात्रीची निवांत झोप अत्यावश्यक:
तुमची सकाळ उत्तम उगवण्याकरता तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होणं अत्यंत आवश्यक असतं.
जेंव्हा तुमची चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं, कामात मन लागत नाही, एकाग्र चित्त होत नाही, उदासी, चिडचिडेपणा या सगळ्या मागे महत्वाचं कारण म्हणजे तुमची झोप व्यवस्थित झालेली नाही.
आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची नितांत आवश्यकता असते. आपल्या मेंदूच्या निरोगी कार्यासाठी आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे.
शांत झोपेमुळे आपल्याला शारीरिक सुदृढता, मानसिक स्पष्टता, आणि जीवनाची गुणवत्ता या महत्वाच्या गोष्टींचा लाभ होतो.
रात्री निवांत झोप लागल्यास उगवणारी सकाळ ही तुमच्याकरता खूप सकारात्मक विचार घेऊन येणारी ठरते. त्यामुळे नवे विचार येतात…नवीन संधी खुणावतात.
म्हणून रोज 7 तासांची झोप अवश्य घ्या.
झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल आणि email पाहू नका:
अगदी काल परवापर्यंत आपण आपल्या पालकांच्या सांगण्यानुसार सकाळी उठल्या उठल्या देवाला आणि सूर्याला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करायचो. पण धावत्या आणि घाईगर्दीच्या काळात सगळच बदलत चाललंय. आज उठल्या बरोबर मोबाईल पाहण्याची वाईट सवय आपल्याला जडली आहे.
यामुळे होतं काय की सकाळी-सकाळी मोबाईलवर आलेल्या संदेशावर आपला mood ठरतोय.
आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे त्या यंत्राने का ठरवावं? त्यामुळे त्या यंत्रांच्या आधीन जाण्यापासून आपण स्वतःला थांबवायला हवं. रोजची सकाळ ही मोबाईल आणि email पाहून करण्याची सवय सोडा. आणि उगवणाऱ्या सूर्याला पाहून आपला दिवस सुरु करा. त्याच्याकडून उर्जा, सामर्थ्य, आणि सकारात्मकता घ्या आणि आलेल्या दिवसाला प्रसन्न मुद्रेने सामोरे जा.
स्वतःकरता 5 ते 10 मिनिटं काढा:
दिवसाची सुरुवात करतांना आपल्याकरीता निवांततेची निदान 5 ते 10 मिनिटं अवश्य काढा. त्यावेळात चहा किंवा कॉफी असे आपले आवडते पेय घ्या. आज दिवसभरात आपल्याला काय काय करावे लागणार आहे याचा शांततेत विचार करा. आजच्या दिवसाला अगदी मनापासून Thank u म्हणा. आजचा दिवस दाखविणाऱ्या निसर्गाला, सृष्टीप्रती मनापासून आभार व्यक्त करा. आपला दिवस सकारात्मकतेने सुरु करण्याइतके सुंदर काहीही नाही.
Brakefast अवश्य करा:
नाश्ता करण्याकरता तुमच्याजवळ वेळ नसतो? 35 ते 54 वयोगटातील सुमारे 18% पुरुष आणि 13% स्त्रिया या न्याहारी करत नाहीत.
याविषयी विचारलं असता त्यात बऱ्याच जणांचे उत्तर असते, अहो काय करणार…वेळ कुठे असतो नाश्ता करण्याकरता?
तुम्ही केवळ रोजपेक्षा 15 मिनिटं जरी अगोदर उठलात नं तरीदेखील पौष्टिक न्याहारी करून घराबाहेर पडू शकता.
सकाळी केलेला हा breakfast तुम्हाला दिवसभर energy पुरवू शकतो इतकी त्यात शक्ती सामावलेली असते. हा नाश्ता केल्यास तुम्हीपूर्ण दिवस समाधानाने व्यतीत कराल आणि इतर snakes आणि भलते-सलते खाण्याची तुमची इच्छा होणार नाही .
त्यामुळे सकाळी आवर्जून आपल्या शरीराला न्याहारी करण्याची सवय लावा.
कुटुंबियांना प्राधान्य द्या:
सकाळी उठल्यानंतर सोशल मिडीयावर दूरच्या व्यक्तींना good morning पाठवण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आस्थेने विचारपूस करत चला. बऱ्याच कुटुंबांमध्ये तर लहान मुलांना वडील आठवडाभर दिसत देखील नाहीत कारण जेंव्हा हि मुलं उठतात तेंव्हा वडील कामावर निघून गेलेले असतात आणि जेंव्हा वडील घरी येतात तेंव्हा मुलं झोपी गेली असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना वेळ देणं हे तुमचं आद्यकर्तव्य असायला हवं.
त्यांच्या जीवावरच तुम्ही खऱ्या अर्थाने बाह्यजगतातील लढाई लढत असता त्यामुळे आपली सकाळ उत्तम करतांना आपल्या लोकांची सकाळ देखील आपण त्यांची विचारपूस करून उत्तम करण्याचा प्रयत्न आवर्जून करायला हवा.
Presentable राहा:
ऑफिस ला जातांना तयार होण्याकरता स्वतःला वेळ द्या…तुमचे दात स्वच्छ असावेत, स्वच्छ अंघोळ, व्यवस्थित प्रेस केलेला पोशाख, अंगावर मारलेला सुंदर परफ्युम, या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या ठरतात. या गोष्टी केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहात, समोरच्याला Presentable दिसता आहात…या सर्व गोष्टींमुळे तुमचा Confidence दुणावतो आणि तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करायला लागता.
ऑफिस ला जातांय…लवकर निघा:
आजकाल मोठमोठ्या शहरांची एक common समस्या होऊन बसली आहे…तसं म्हणाल तर सर्वसामान्य आणि विचार केलात तर भयावह! आणि ती समस्या म्हणजे ट्राफिक!
या समस्येला शहरातील नागरीक रोज सामोरे जातात.
म्हणूनच ऑफिस ला वेळेवर पोहोचण्याचा ताण येऊ द्यायचा नसेल तर योग्य नियोजन करून वेळेआधी ऑफिस ला निघत जा. त्यामुळे ट्राफिक मध्ये अडकलात तरीही तुमच्यावर ताण न येता वेळेवर तुम्ही तुमच्या कार्यालयात पोहोचाल.
ऑफिस ला जाण्याचा देखील आनंद घ्या:
तुम्ही ऑफिस ला कसे जाता? अर्थात एकटे जाता, की तुमचा group असतो, की लोकल ने प्रवास करता?
हा प्रश्न या करता विचारला कारण तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांसोबत प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्ही घरापासून ते ऑफिसपर्यंतचा वेळ देखील निश्चित आनंदात घालवाल. एकमेकांचे अनुभव…सुख-दुखः…विनोद अश्या सगळ्याची देवाण-घेवाण करत हा प्रवास तुम्हाला आनंदच प्रदान करणार आहे.
लोकल ने प्रवास करत असाल तरीही नव्या ओळखी तयार करा…मित्र बनवा…कारण तुम्हाला दररोज हीच लोकल पकडावी लागणार आहे, येतांना आणि जातानाही. त्यामुळे शांततेने खिडकी बाहेर बघत वेळ घालवण्यापेक्षा नवीन मित्र तयार करा आणि नव्याने अनुभवांची देवाण-घेवाण करा.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणाला द्या प्राधान्य:
आपलं घर असो किंवा आपण कार्य करत असलेलं ठिकाण, या दोन्ही ठिकाणी स्वच्छता फार महत्वाची आहे. तुम्ही जेंव्हा तुमच्या काम करण्याच्या ठिकाणी पोहोचता तेंव्हा आपली टेबल-खुर्ची, टेबलवर असलेल्या फाईल्स, computer , हे सगळे आधी व्यवस्थित ठेवा
सध्या कामात न येणाऱ्या फाईल्स दुसऱ्या ठिकाणी नीट रचून ठेवा. संगणकातील कमी महत्वाच्या फाईल्स देखील एक फोल्डर बनवून त्यात टाका कारण आपलं टेबल असो किंवा संगणक…इतस्ततः पसरलेल्या पसाऱ्यामुळे तुम्ही बैचेन होता.
आपल्या आजूबाजूची धूळ झटकून वातावरण पूर्णतः स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण अस्वच्छते मुळे तुमच्यावर ताण येतो, चिडचिड वाढते, आणि नेमकं तुम्हाला हे का होतंय याचं कारण त्या वेळी लक्षात देखील येत नाही.
घरी देखील तुमचा वावर हा स्वच्छ आणि नीटनेटका असायला हवा जेणेकरून अस्वच्छतेचा तुमच्यावर ताण पडणार नाही आणि तुमचा दिवस आनंदात सुरु होईल.
दिवसाचे वेळापत्रक तयार करा:
आपली दैनंदिनी किंवा आपले वेळापत्रक तयार करण्याची सवय ही एक उत्तम सवय आहे. त्यामुळे आपला दिवस चांगला आणि व्यवस्थित व्यतीत करण्याकरता ही सवय अंगी बाणवायलाच हवी.
वेळापत्रक तयार करतांना अति महत्वाची म्हणजेच तातडीची…कमी महत्वाची…आणि नंतर करता आली तरीही चालतील अश्या पद्धतीने दिवसभरातील कार्याचा क्रम लावा. आणि दिवस अखेर कोणकोणती कामं आज आपण पूर्ण केलीत याची तपासणी करा. असे केल्याने तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागेल आणि तुमच्या दिनक्रमाला एक शिस्त लागेल. त्यामुळे कामं करतांना तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही, घाई गडबड होणार नाही, आणि कामं व्यवस्थित पूर्णत्वास जातील.
आपल्या कार्यातील अडथळे दूर करा:
ऑफिस मध्ये आपले टार्गेट्स पूर्ण करतांना येणाऱ्या अडथळयांना आपल्याला दूर करता यायला हवं.
बरेचदा काम करत असतांना जाहिरातींचे, त्यांच्या उत्पादनांचे विविध कंपन्यांचे emails येत रहातात आणि आपल्याला कामात अडथळा निर्माण होतो. आजकाल सोयीनुसार या असल्या जाहिरातींचे फोन कॉल आपल्याला बंद करता येतात…ते बंद करून आपल्या टार्गेट वर लक्ष केंद्रित करा.
ऑफिस मध्ये असतांना सोशल मिडिया (WhatsApp, Facebook) या पासून दूर राहा, आणि ही गोष्ट मी काम करत असतांना वापरणार नाही हि खुणगाठ मनाशी निश्चित करा. यामुळे तुम्ही तुमच्या टार्गेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल आणि तुमच्यावर ऑफिसच्या कामाचा जास्त ताण येणार नाही.
ताण येणाऱ्या गोष्टींचे योग्य नियोजन करा:
आजकाल ऑफिस मध्ये प्रत्येक काम हे टार्गेट ओरीअन्टेड असल्याने टार्गेट पूर्ण करतांना ताण येणे अगदी स्वाभाविक असते. परंतु जर योग्य नियोजन केलंत तर हा ताण कमी देखील करता येतो आणि तुमचे टार्गेट देखील पूर्ण होते.
तुमच्यातील प्लस point तुम्हाला स्वतःला ओळखता यायला हवेत आणि त्यांच्या जोरावर आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा.
कामाचे योग्य नियोजन, त्याकरता करावे लागणारे प्रयत्न, उत्तम संभाषण कौशल्य, तुमचा सोशल वावर, ऑफिस मधील तुमचे इतरांशी असलेले संबंध या सगळ्याच्या जोरावर आपल्या टार्गेट ला पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.
पहा! यश तुमचेच असेल…
ऑफिस मधील वातावरण तुम्ही हसतं-खेळतं ठेवा:
आपण ऑफिस ला जातो ते काम करण्या करता हे जरी खरं असलं तरीही ऑफिस मधील वातावरण हे जर हेल्दी आणि हसतं-खेळतं राहिलं तर काम हे काम न वाटता ते वातावरण आपल्याला हवंहवसं वाटायला लागतं.
उपस्थितीने हे वातावरण हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करा…तुम्ही नसताना इतरांना तुमची उणीव भासायला हवी, असा तुमचं वावर असायला हवा.
काहीकाही ठिकाणी काम करतांना कृत्रिमता जाणवते आणि कामाचा आनंद कधी घेताच येत नाही…त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण हळूहळू रुक्ष आणि कोरडे वाटू लागते.
त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तेथील वातावरण प्रसन्न आणि हसतमुख ठेवण्याचा सतत प्रयत्न करत राहा.
आपल्या ध्येयाचं पुनरावलोकन करा:
जीवन जगतांना प्रत्येकाचं एक ध्येय असतं. त्या ध्येयाला केवळ उराशी बाळगून ते ध्येय पूर्ण होणार आहे का? तर नाही.
स्वामी विवेकानंद म्हणतात
“उठा! कामाला लागा आणि तोवर थांबू नका जोवर तुम्ही तुमचे इच्छित ध्येय गाठत नाही.”
आपल्या ध्येयाचं अवलोकन करा. उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याकरता काय योजना तयार आहे? त्याचा विचार करा.
कारण रोज आपण सकाळी उठतो आणि पोटापाण्यासाठी जे कष्ट करावे लागतात त्याकरता आपली धावपळ सुरु होते आणि दिवस संपतो देखील…या सगळ्यात ध्येय गाठण्याचे केवळ मनातच राहून जाते आणि ही सल कायम मनाला कोरत राहते.
त्यामुळे आपले ध्येय पूर्ण करण्याकरता योग्य ती पाऊलं उचला आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ध्यास सोडू नका.
मित्रानो येणारी प्रत्येक सकाळ ही तुमच्याकरता आशेचा नवा किरण घेऊन येणारी असते
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याकरता नवनव्या आव्हानांनी भरलेला असतो
पण जेंव्हा आपण आत्मविश्वासाने या आव्हानांचा सामना करतो तेंव्हाच तर आपला खरां कस लागतो.
त्यामुळे छोट्या-छोट्या आव्हानांसमोर घाबरून न जाता मोठ्या धैर्याने या आव्हानांचा सामना करा आणि मग पहा कोणतीही समस्या…कुठलीही अडचण तुमचा आनंद हिरावून घेऊ शकणार नाही. आणि प्रत्येक सकाळ तुमच्याकरता प्रसन्न उगवेल…आणि हो वर दिलेल्या टिप्स चा आपल्या आयुष्यात नक्की समावेश करून पहा…तुम्हाला निश्चित फरक जाणवेल…