Wednesday, July 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

वीर तानाजी मालुसरे यांची कहाणी

Tanaji Malusare Information in Marathi

आपल्या वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी निवडक मावळ्यांना सोबतीला घेऊन स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा करणाऱ्या शिवाजी महाराजांचा एक एक मावळा सुद्धा तितकाच  झुंजार…शूरवीर…बलाढ्य…कर्तृत्ववान…विश्वासू…प्रामाणिक…आणि प्रचंड ताकदीचा लढवय्या सैनिक होता.

ज्या प्रमाणे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी घेतली होती त्याच प्रमाणे त्यांच्या समवेत असलेला प्रत्येक मावळा स्वराज्य स्थापन करण्याकरता प्राणपणाने लढला…

त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मावळ्यांमध्ये मौल्यवान हिऱ्याप्रमाणे लढणारे एक पराक्रमी योद्धा म्हणजे तानाजी मालुसरे होत.

वीर तानाजी मालुसरे यांची कहाणी – Tanaji Malusare Information in Marathi

Tanaji Malusare

वीर तानाजी मालुसरे चा इतिहास – Tanaji Malusare History in Marathi

बालपण:

तानाजी मालुसरे याचं बालपण सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील गोडवली नावाच्या लहान गावात गेलं.

तानाजींचा पराक्रम:

अफजल खान जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांना अफजल खानावर तुटून पडण्याकरता हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. या मोहिमेत तानाजी मालुसरेंनी सैन्याच्या बरोबरीने लढत खानाच्या फौजेचा फज्जा उडविला.

कोकण स्वारीदरम्यान महाराजांनी संगमेश्वर काबीज केल्यानंतर तानाजी आणि पिलाजी यांना तेथे ठेवलं, एका रात्री सुर्व्यांनी अचानक हल्ला केला हे पाहून पिलाजी पळत सुटले. पण वीर तानाजी मालुसरेंनी मोठ्या धैर्याने सुर्व्यांनी केलेला हल्ला मोडून काढला आणि खरा मर्द कुणाला म्हणतात हे शत्रूंना देखील दाखवून दिले.

शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात, रायगडालगत कोकण येथे तिथल्या दंगलखोर जमातींनी जो उच्छाद मांडला होता, त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी तानाजींवर सोपविली.

तेंव्हा तानाजी मालुसरे तिथल्या उमरठे या गावी वास्तव्याला राहिले व त्या लोकांशी आपलेपणाने संबंध प्रस्थापित करून स्वराज्याच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेतलं.

कोंढाणा मोहिमेकरता तानाजींची निवड – Tanaji Malusare Story (Kondana Fort)

स्वराज्याच्या रक्षणार्थ पुण्याजवळील कोंढाणा किल्ला ताब्यात येणं अत्यंत आवश्यक होतं आणि यासाठी जिजाबाई फार आग्रही होत्या…शिवाजी महाराजांना या किल्ल्याचं महत्वं ठाऊक होतं परंतु कोंढाण्याला मोगलांचा असलेला प्रचंड वेढा त्यांना चांगलाच अवगत होता.

आणि त्यामुळे महाराजांचा नाईलाज होता. पण अखेरीस मातेच्या हट्टापुढे महाराजांना नमावे लागले आणि कोंढाणा पुन्हा मिळवण्याची त्यांनी शपथ घेतली.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर आणि लढवय्ये सैनिक होते ज्यांनी महाराजांच्या आज्ञेखातर अगदी हसत हसत कोंढाणा मिळवण्याकरता जीवाची बाजी लावली असती, पण ज्याक्षणी या मोहिमेचा विचार महाराजांच्या मनात आला तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर एकाच पराक्रमी योध्याचा चेहरा आला…वीर तानाजी मालुसरे!

शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि अत्यंत विश्वासू सोबती म्हणून तानाजी मालुसरे कायम महाराजांसमवेत राहीले…स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांनी महाराजांना मोलाची साथ दिली होती.

महाराजांनी ज्यावेळी किल्ले घेण्याची मोहीम राबविली त्यात तानाजी मालुसरे हे सर्वात आघाडीवर होते. ऐतिहासिक अश्या अफजलखानाच्या वधाच्या वेळी देखील त्यांनी आपला पराक्रम दाखविला होता.

ज्यावेळी महाराज आपल्या 10-12 विश्वासू साथीदारांसामावेत शाहीस्तेखानावर हल्ला करण्याकरता लाल महालात घुसले तेंव्हा देखील त्या साथीदारांमध्ये तानाजी मालुसरे त्यांच्या समवेत होते…त्यामुळे महाराजांनी दरवेळी तानाजींचा पराक्रम जवळून पाहीला होता.

त्यामुळे कोंढाणा मिळविण्याची मोहीम तानाजी फत्ते करू शकतात याची महाराजांना पूर्ण कल्पना होती.

या मोहिमेकरता ज्यावेळी महाराजांनी तानाजी मालुसरेंना तातडीचे बोलावणे धाडले त्यावेळी तानाजी उमरठे गावी आपला मुलगा रायबाच्या लगीनघाईत व्यस्त होते.

पण महाराजांनी बोलावले म्हंटल्यावर हातातली सगळी कामं सोडून तानाजी महाराजांची भेट घेण्याकरता आधी गडावर पोहोचले.

आधी लगीन कोंढाण्याचे – Aadhi Lagin Kondhanyache

महाराजांनी ज्यावेळी आपला मनसुबा तानाजींना सांगितला तो ऐकून तानाजी कृतकृत्य झाले…या मोहिमेकरता महाराजांनी आपला विचार केला यासारखे भाग्य काय असू शकते अश्या विचाराने त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले.

यावेळी तानाजिंसोबत त्यांचे बंधू सूर्याजी आणि शेलारमामा हे देखील होते. मोहीम समजल्यानंतर शेलारमामा तानाजींना म्हणाले ‘लगीन उरकून घेऊ आणि निघू’. परंतु त्यावर तानाजी लगेच उद्गारले,

“आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे”…

तानाजी महाराजांची भेट घेतल्यानंतर जिजाऊ मांसाहेबांना भेटायला गेले, त्यांचा आशीर्वाद  घेतला. मांसाहेबांनी देखील त्यांना “विजयी होऊन या” असा आशीर्वाद दिला.

तानाजींनी कोंढाण्याची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि रायबाच्या लग्नाची जवाबदारी महाराजांवर सोपवत “जर परत आलो तर रायबाचे लगीन लाऊन देईन आन जर का मेलो तर तुमी त्याचं लगीन लाऊन द्या” असं म्हणत महाराजांचा निरोप घेतला.

मोहीम फत्ते –

तानाजी मालुसरे हे बारा हजार पायदळ सैनिकांचे सुभेदार होते.

तानाजी ४ फेब्रुवारी १६७० साली माघ वद्य अष्टमीला रात्री आपल्या मराठा सैन्यासमवेत  गुंजवणी नदी ओलांडून कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले.

गड गाफील होता गाढ झोपी गेलेला… या गडावर अत्यंत शूर असा मूळ राठोड राजपूत असलेला उदयभान नावाचा सरदार तैनात होता. तो मुस्लीम झाला होता त्याच्या नेतृत्वातील राजपूत सैन्य त्यावेळी गडावर तैनात होते.

अंधारी रात्र होती तानाजी गडाच्या पायथ्याशी आपल्या सैन्यासह योग्य वेळेची वाट बघत होते. गड सर करण्याकरता तानाजीनी शत्रू विचार देखील करणार नाही असा द्रोणागीरीचा कडा निवडला.

तानाजीनी आपल्या यशवंती घोरपडीच्या कमरेला साखळी बांधली आणि तिला उंच कड्यावर फेकले पण तत्क्षणी यशवंती परत आली…तिला पुढे होणाऱ्या घटनेची चाहूलच लागली होती कदाचित.

पण तानाजी कुठे त्याकडे लक्ष देणार होते, ते आपल्या सैन्यासह किल्ल्यात प्रवेश करते झाले आणि त्याक्षणी शत्रूवर तुटून पडले.

पुण्याच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजावर आपले सैन्य असेल म्हणून आधी त्या दिशेने जाऊन त्यांनी पहारेकऱ्यांवर हल्ला चढविला आणि त्यांना संपविले.

इतर दरवाज्यांना देखील ताब्यात घेत तिथल्या पहारेकऱ्यांना देखील यमसदनी धाडले…गडावर असणाऱ्या सैनिकांना हा हल्ला अनपेक्षित होता. या हल्ल्याने फौज जागी झाली.

उदयभान ने समयसूचकता दाखवत सैन्याला सावध केले. सिद्दी हलाल हा गडाचा सरनोबत आधी तानाजीला सामोरा गेला, तानाजी आणि सिद्दी हलाल यांच्यात तुंबळ युद्ध पेटले आणि तानाजिंनी त्याला आडवा पाडला.

सुर्याजीच्या नेतृत्वात सर्व सैनिक कल्याण दरवाज्याजवळ जमून दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करीत होते कारण ज्या साखळीच्या सहाय्याने मराठा सैनिक किल्ल्यावर चढत होते ती साखळी मधूनच तुटली होती.

सैन्याचा सामना करता करता तानाजी कल्याण दरवाज्याकडे सरकत होते…परंतु त्याक्षणीच उदयभानने तानाजींवर हल्ला केला, उदयभानाच्या जोरदार हल्ल्याने तानाजींच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या…तरीदेखील हातावर शेला बांधून ते त्यावर त्याचे वार झेलत होते.

रात्रीचा सतत झालेला प्रवास, किल्ल्यावरची कठीण चढाई, मोहीम फत्ते करण्याची जवाबदारी आणि दडपण, या सगळ्यांमुळे तानाजी थकले आणि खचले होते…आणि त्यांच्या तुलनेत उदयभान ताकदीनिशी त्यांच्यावर हल्ला करीत होता.

त्याच्या हल्ल्याने तानाजींची ढाल तुटली ते रक्तबंबाळ झाले परंतु त्याचे वार ते आपल्या हातावर झेलत होते…त्यांचा हा पराक्रम जणू नियतीला देखील बघवला नाही व उदयभानच्या झालेल्या जबरदस्त हल्ल्याने ते धारातीर्थी कोसळले.

पण मृत्यूला सामोरं जातांना सुद्धा त्यांनी असंख्य शत्रूंना यमसदनी धाडले व आपल्या मराठा सैन्याला वाट मोकळी करून दिली. तानाजींना पडतांना पाहून देखील ८० वर्षाच्या शेलारमामांनी आपले धैर्य खचू न देता नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली, शत्रूशी लढता लढता कल्याण दरवाज्याजवळ पोहोचत तेथील पहारेकऱ्यांना कापून काढले आणि आपल्या सैन्याकरता त्यांनी तो दरवाजा उघडला.

तानाजी धारातीर्थी पडले हि वार्ता आपल्या सैन्याचा धीर खचू नये याकरता शेलारमामांनी  मुद्दाम लपविली. त्यानंतर सूर्याजीने मोगलांचा आणि उदयभानचा खात्मा करून कोंढाणा ताब्यात घेतला. गवताच्या गंजी पेटवून सुर्याजींनी पाच तोफांची सलामी दिली. या धडाडत्या तोफा महाराजांच्या कानावर पडल्या आणि गड जिंकल्याचा संकेत मिळाला.  अवघ्या एका रात्रीत मराठा सैन्याने कोंढाणा हे स्वराज्याचे मूल्यवान रत्न आपल्या ताब्यात मिळवलं.

गड आला पण सिंह गेला – Gad Aala Pan Sinha Gela

जिजाबाईंना आणि महाराजांना खूप आनंद झाला. परंतु आपला पराक्रमी धाडसी लढवय्या तानाजी या मोहिमेत धारातीर्थी पडल्याचे ऐकून त्यांना अतीव दुखः झाले. ते ऐकताच ऐतिहासिक उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले…ते उद्गारले “गड आला पण सिंह गेला”( Gad Ala Pan Sinh Gela).

तानाजींचे स्मारक – Tanaji Malusare Samadhi

तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे करण्यात आले. याच सिंहगडावर तानाजी मालुसरेंचा अर्धपुतळा त्यांचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे. त्यांच्या रायगड जिल्ह्यातील उमरठे या गावी देखील त्याचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ तानाजी मालुसरें बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved