पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa

महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे तो म्हणजे पेमगिरी किल्ला.

हा किल्ला हा भीमगड आणि शहागड या नावाने सुद्धा ओळखल्या जातो.

पेमगिरी किल्ला माहिती – Pemgiri Fort Information in Marathi

पेमगिरी किल्ला हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बाळेश्वर या डोंगररांगेत आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2772 फुट उंचीवर असून किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास 5 एकर आहे.

या किल्ल्यावर पेमाई देवीचे मंदिर आहे. पेमाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव हे पेमगिरी पडले असावे असे या परिसरातील लोक सांगतात.

पेमगिरी किल्ला इतिहास – Pemgiri Fort History

हा किल्ला आडबाजूला असल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे. हा किल्ला इ.स. 12व्या शतकात यादव राजांनी बांधला मात्र गडावर सातवाहन काळातील बांधकाम देखील आपल्याला दिसून येते.

त्यामुळे किल्ला नेमका कुणाच्या कारकिर्दीत बांधला गेला याबाबतीत संभ्रम आहे. हा किल्ला आकाराने जरी लहान असला तरी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी याच पेमगिरी किल्ल्यावरून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहून त्या दिशेने प्रयत्न केले.

शिवाजी महाराजांच्या जन्माआधी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले काही काळ याच गडावर वास्तव्यास होते. या गडावर पेमादेवीचे दोन मंदिर आहेत त्यातील एक मंदिर राजमाता जिजाऊ यांनी बांधून घेतल्याचे म्हटले जाते.

शहाजीराजे भोसले ज्यावेळी निजामशाहकडे सरदार होते त्यावेळी त्यांनी निजामाचा मुलगा मुर्तजा याची कैदेतून सुटका करून पेमगिरी किल्ल्यावर आणले. त्याला गादीवर बसवून शहाजी महाराज वजीर झाले.

शहाजी राजेंनी मुर्तजा निजामशहाला आपल्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या किल्ल्यावरून जवळपास 3 वर्षे राज्यकारभार सांभाळला. स्वराज्य निर्माण करता यावे हि त्यामागची भावना होती.

पुढे मोगल आदिशाहीसोबत तह करून निजामशाहीवर चाल करून गेले. राज्य चालवणे कठीण झाल्यामुळे शहाजी राजांनी 1636 मध्ये या दोघांसोबतही तह केला आणि निजामशाहीचा अस्त झाला.

त्यानंतर पेशवेही काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. शहाजीराजेंच्या माध्यमातून स्वराज्याचा विचार याच किल्ल्यावरून रुजला.

पेमगिरी किल्ल्याविषयी आणखी माहिती – About Pemgiri Fort

या गावातून आपण किल्ल्याकडे निघालो की किल्ल्यावर जाण्यासाठी सुरवातीला स्थानिक लोकांनी बांधलेल्या दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या संपल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत.

पुढे पेमगीरीचा गोलाकार डोंगर लागतो जो शिवलिंगाप्रमाणे भासतो. थोडे पुढे गेल्यानंतर देवीचे एक छोटेखानी मंदिर लागते. त्यानंतर आपल्याला या मंदिरासमोरच सातवाहन काळातील चार आयताकृती पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतात.

या टाक्यांना लागुनच समोर कातळात कोरून काढलेला हौद आहे. पुढे किल्ल्याच्या दक्षिणेकडील टोकावर एक उध्वस्त झालेल्या वास्तूचा चौथरा पहावयास मिळतो. याव्यतिरिक्त किल्ल्याचे फारसे अवशेष आढळून येत नाहीत.

गडावर याआधीही बांधकामे कमी असण्याचीच शक्यता जास्त आहे. गडावर असणारी सपाट जागेची कमतरता हे त्याचे कारण असू शकते. किल्ल्यावरून बाळेश्वर डोंगररांग दिसते.
पेमादेविच्या मंदिरात देवीची एक संगमरवरी मूर्ती आहे.

किल्ल्याच्या उत्तरेला टेहळणी बुरुज आहेत, सध्या बुरुज अस्तित्वात नाहीत पण येथून दूरवरचा परिसर दृष्टीस पडतो.

बुरुजाकडे जात असतांना काही अवशेष आपल्याला दिसतात. अवशेषावरून जाणवते की, त्याठिकाणी मोठा वाडा असला पाहिजे.

याव्यतिरिक्त  बुरुज, दरवाजा तटबंदी इ. किल्ल्याची वैशिष्टे असणाऱ्या बांधकामाचे कुठलेच अवशेष किल्ल्यावर दिसून येत नाहीत, आणि त्यामुळेच आपण किल्ल्यावर आहोत असे वाटत नाही. संपूर्ण किल्ला हा साधारणत: दोन तासात पाहून होतो.

गडाच्या आजूबाजूच्या परिसरात भटकंती करायची असेल तर पेमगिरी गावात गडाच्या खाली एक सुंदर चिरेबंदी चौकोनी बारव आहे.

बारव म्हणजेच जुन्या काळात पाणीसाठा करण्यासाठी दगडांची जागा तयार करण्यात येत असे.

किल्यापासून सुमारे 2.5 कि.मी. अंतरावर. मोरदरा नावाच्या भागात असलेला एक प्राचीन महाकाय वटवृक्ष आढळतो.

सुमारे दीड एकरपेक्षा जास्त जागेत हा वटवृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर जवळपास 60 फुट आहे.

परिसरातील लोकांची या वटवृक्षावर नितांत श्रद्धा आहे.

पेमगिरी येथे कसे पोहोचाल – How to reach Pemgiri Fort

Pemgiri  हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले गाव आहे. तुम्हाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

1) नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरून १४ किमी.
2) संगमनेर-अकोले रस्त्यावरून कळस गावापासून १० किलोमीटर

तर पेमगिरी किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका.

आणि अशाच नवनवीन माहितीसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

पेमगिरी किल्ल्याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Pemgiri Fort

प्रश्न. निजामाच्या मुलाची सुटका करवून पेमगिरीवरून कुणी राज्यकारभार पाहिला?

उत्तर: शहाजीराजे भोसले यांनी.

प्रश्न. पेमगिरी किल्ला इतर कोणत्या दोन नावांनी ओळखला जातो?

उत्तर: भीमगड आणि शहागड.

प्रश्न. पेमगिरी किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top