महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती – Gauri Pujan

Gauri Pujan in Marathi

माहेरवाशिणीला माहेरची ओढ लावणारा आणि सासुरवाशीणीची लगबग वाढविणारा महालक्ष्मीचा म्हणजेच गौराईचा सण चोहोदुर अतिशय भक्तिभावात आणि आनंदात साजरा होत असतो.

भाद्रपदात गणपतीबाप्पाच्या आगमना नंतर काही दिवसांमधेच घरोघरी गौराईचे आगमन होते. अर्थात ज्यांच्याकडे महालक्ष्म्या पुर्वापार आहेत किंवा नवसाने त्या स्थापीत केल्या जातात अन्यथा कुणाकडे त्या पाहुण्या म्हणुन देखील स्थापीत करण्यात येतात.

कुठे यांची स्थापना महालक्ष्मी म्हणुन करण्यात येते तर कुठे गौरी म्हणुन या गौरींना गणपतीच्या बहिणी मानले जाते. आधी गणपती येतो आणि लगोलग आपल्या बहिणींना घेऊन येतो अशी मान्यता आहे.

Gauri Pujan

महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती – Gauri Pujan

तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पुजनाचा व पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असे एकुण तीन दिवस त्यांचे वास्तव्य घराघरात असते.

अनुराधा नक्षत्रावर त्यांची स्थापना केली जाते ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पुजन आणि मुळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करण्यात येते.

गौरींच्या आगमनापासुन तर विसर्जनापर्यंत सारं निराळच असतं. चैतन्यानं भारलेलं वातावरण असतं. तीचे आगमन होतांना “कोण आलं? ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली सोन्याची पावलं घेऊन घरा आली” असं म्हणण्याची परंपरा आहे.

गौरी पूजनाचा विधी – Jyeshta Gauri Puja Vidhi

ग्रामिण भागातील सगळया सवाष्णी एकत्र साजश्रृंगार करून नदीवर जायला निघतात. जातांना आपापल्या माहेरचे वर्णन गाण्यातुन केले जाते. गप्पा गोष्टी गाणी म्हणत सगळयाजणी आनंदाने नदीवर पोहोचतात नदीतील पाच खडे उचलायचे तेरडयाचे पान वाहुन पुजा करायची आणि उत्साहाने गौर म्हणुन त्या खडयांना वाजत गाजत घरी आणायचे.

वाढत्या शहरीकरणामुळे गौरींना आता अंगणातुन, तुळशी वृंदावनापासुन घरात आणले जाते.

घरी आल्यानंतर गौर आणणाऱ्या सवाष्णींचे गरम पाण्याने पायु धुतले जातात. त्यांना हळद कुंकु लावुन औक्षवण केल्या जाते. आणि अश्या तर्हेने गौरींचे आगमन होते.
घरात आणतांना दारातले धान्याचे माप गौरींनी ओलांडायचे तीचे आगमन अतिशय शुभ आणि धनधान्यांच्या पावलांनी होत असल्याची समजुत असल्याने या समयी हळदी कुंकवाची पावलं देखील काढली जातात. दारोदारी रांगोळया सजतात.

त्यांना स्थानापन्न करण्यापुर्वी संपुर्ण घरातुन फिरवण्यात येतं. स्वयंपाक घर, झोपायची खोली कपाटं, तिजोरी, असं सगळं सगळं फिरवुन “या सर्व ठिकाणी तु वास कर” अशी महालक्ष्मीला प्रार्थना केली जाते.

प्रत्येक कुटूंबात आपापल्या प्रथेप्रमाणे पुजा करण्याची प्रथा आहे. कोकणस्थ मंडळींमधे गौरींच्या प्रत्यक्ष मुर्तींची स्थापना न करता वाहात्या नदीतील खडे आणले जातात आणि त्या खडयांची ’ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर’ म्हणुन स्थापना केली जाते.

गौरींच्या आगमना पुर्वीपासुन घरातील स्त्रियांची लगबग कित्येक दिवस आधीपासुन सुरू होते. झाडझुड, स्वच्छता, साफसफाईपासुन सुरू झालेली कामं, त्यानंतर फुलोरा (फराळाचे जिन्नस) तयार करण्यापर्यंत सगळी धावपळ सुरू असते. पुरूष मंडळी गौराईच्या स्थापनेकरता मंडप बांधणी, डेकोरेशन, भाजीबाजार या तयारीत मग्न असतात.

त्यांची पुजा अर्चा अतिशय कडक असल्याचे भाविक समजतात आणि त्याप्रमाणे घरात पाविन्न्य जपले जाते. पुरणावरणाचा सगळा स्वयंपाक तयार केल्या जातो. 16 किंवा 32 भाज्यांची एकत्र भाजी तयार केली जाते.

संपुर्ण वर्षभरात इतक्या भाज्यांची एकत्र भाजी केवळ याच सणाला केली जाते.

महत्वाची एक गोष्ट येथे लक्षात घेता येईल ती अशी की हा काळ पावसाळयाचा असतो. पावसाचे दोन महिने उलटलेले असतात. सर्वदुरचं वातावरण हिरवाईने नटलेलं असतं. आरोग्याला पोषक अश्या कितीतरी वनस्पती, भाज्या उगवलेल्या असतात त्या याच दिवसांत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्या आपल्या पोटात जाऊन आरोग्यलाभ मिळावा म्हणुन देखील ही 16 आणि 32 भाज्यांची भाजी करण्याची प्रथा रूढ झाली असावी.

पुजेचा आणि महानैवेद्याचा दिवस थाटामाटात आणि मोठया उत्साहात संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र निरोपाची हुरहुर प्रत्येकाच्या मनात असते.

कारण कुणालाही गौराईला निरोप देण्याची ईच्छा नसते. तिचा चैतन्यमयी सहवास सोडुन तिचे विसर्जन कुणालाही करावेसे वाटत नाही तरी देखील रितभात पाळत गौराईला दहीभाताचा आणि करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षद वाहुन “पुनरागमनायच” म्हणत ओटी भरून गौराईला निरोप दिला जातो.

Read more:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top