कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही,अशीच एक छोटीशी स्टोरी जी आपल्याला शिकवण देऊन जाईल.

Karm Tase Fal

आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत, आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्यकाळ ठरवू शकतो, आता जर योग्य मेहनत घेतली तर भविष्य उज्वल होणार पण आळस करत राहिलो तर वाटेला अपयश येणार, एवढंच नाही तर चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार, आणि कर्म वाईट केलेत तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार. तर आजच्या लेखात आपण एक शिकवण देणारी छोटीशी स्टोरी पाहणार आहोत, जी आपल्याला आपले योग्य कर्म करण्यासाठी प्रेरणा देईल, तर चला पाहूया एक छोटीशी स्टोरी.

जसे कर्म कराल तसेच फळ मिळते –  Marathi Story about Karma

Marathi Story about Karma
Marathi Story about Karma

एका राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता, त्याची प्रजा सुध्दा सुखी होती राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पहायला मिळत नव्हती. असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या दिवशी या जगात बाकी लोकांनी सुध्दा जन्म घेतलाच असेल पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत, आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला.

तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली. राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले, आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच हजर झाले, दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली. तेव्हा राजाने त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नाला सभेत मांडले. त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल, मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत.

कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा सभेतील एका वृध्द व्यक्तीने राजाला सांगितले की राजन आपल्या या प्रश्नाचे उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात, राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली, आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला. बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले, ते बाबा कोळसे खात होते, पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते म्हणून तो बाबा जवळ गेला आणि त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला,

तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की माझ्याजवळ तूझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही आहे, हे ऐकून राजा निराश झाला. पण बाबाने त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात त्यांना जाऊन विचार. त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल, राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघाला.

जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसला तो साधू बाबा माती खात होता, राजाला पाहून आश्चर्य वाटलं. पण त्याला त्याविषयी काही देणंघेणं नव्हतं त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते, तो बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला तेव्हा त्या बाबा ने सुध्दा त्याला सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही पण तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजाराच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो जो सर्वकाही जाणतो, त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार. तो विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे काही क्षण जगत आहे, लवकर गेलास तर तुला प्रश्नाचे उत्तर मिळेल, राजाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता पण काय करणार त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते.

त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहचला त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहचवले. तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या व्यक्तीने राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता भटकलो होतो आणि आपल्या जवळील खायच्या वस्तू सुध्दा संपायला आल्या होत्या. आपल्याजवळ थोडेशेच पीठ शिल्लक होते ज्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या.

तेवढ्यात आपल्या जवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर केले की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का? तसेच दुसऱ्याने म्हटले की तुला भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का? मी सुध्दा त्याला नकार दिला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिश्याची भाकरी खायला दिली होती. आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तेथून निघून गेला होता.

राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याला कळलं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी होता. तर मित्रहो या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की कर्माचे फळ हे मिळतेच ते चांगले असो की वाईट. म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे काम करा कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळतेच.

आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडली असेल आपल्याला लिहिलेली स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here