प्रतापगड किल्ला इतिहास

Pratapgad Fort chi Mahiti 

छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत आलो आहोत. या यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून द्यायला पुरेश्या आहेत.

महाराजांनी केलेल्या पराक्रमावर अनेक कवनं, ओव्या, गीतं, पोवाडे रचल्या गेले, ते ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि त्यावेळी महाराजांनी तो प्रसंग कश्यापद्धतीने निभावून नेला असेल या कल्पनेत आपण ध्यानमग्न होतो. प्रतापगडावरील महाराजांची आणि अफजलखानाची भेट देखील इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहे. त्या भेटीवर पोवाडे देखील गायले गेले आहेत.

प्रतापगड किल्ला इतिहास – Pratapgad Fort Information in Marathi  

Pratapgad Fort Information in Marathi
Pratapgad Fort Information in Marathi

प्रतापगड किल्ल्याची माहिती – Pratapgad Fort Marathi Mahiti

महाराज आणि अफजलखान या दोघांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला प्रतापगड आज देखील त्या जाज्वल्य स्मृती आपल्या हृदयात साठवून दिमाखात उभा आहे. सातारा जिल्ह्यात असलेला प्रतापगड गिरिदुर्ग प्रकारातील गड असून सह्याद्रीच्या रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलात प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे.

समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 1081 मी. असून गडाच्या दोन्ही बाजूंनी 200 ते 250 मी. खोल दरी दिसते. प्रतापगड वाई जवळ जावळीच्या खोऱ्यात महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असून  महाबळेश्वरपासून अंतर अवघे 22 की.मी. एवढे आहे. 72 क्रमांकाच्या राज्य महामार्गाने आपल्याला प्रतापगडावर पोहोचता येतं. किनेश्वर व पार या दोन्ही गावांमधील टेंभावर प्रतापगड बांधण्यात आला आहे. गड चढण्या करता तसा फार अवघड नसून गडाच्या पायथ्यापर्यंत वाहनाने पोहोचता येतं. गडावर पायी जाण्याकरता पार आणि कुंभरोशी गावातून पायवाट आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर जायला काही चोरवाटा देखील आहेत.

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास – Pratapgad Fort History in Marathi 

जावळी खोरे स्वराज्यात आल्या नंतर महाराजांनी मोरो त्र्यंबक पिंगळे यांना  ई.स.1656 मधे हा गड बांधून घेण्याची आज्ञा दिली. या गडाचे मुख्यकिल्ला आणि बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. या भागांमध्ये तलाव देखील आहेत, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गडाच्या चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहेत.

मुख्यकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3885 चौ.मी. असून बालेकिल्ल्याचे 3660 चौ.मी. इतके आहे. दक्षिण दिशेकडचे बुरुज 10 ते 15 मी. उंच आहेत. या बुरुजांपैकी रेडका, अफजल, केदार, राजपहारा या बुरुजांचे अवशेष आजही टिकून असल्याचे दिसतात.

मुख्यकिल्ल्यात तुळजा भवानीचे मंदिर असून ई.स. 1661 मध्ये शिवरायांच्या आज्ञेनुसार मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी ते स्थापित केले होते. तुळजा भवानीचे मूळ मंदिर दगडी गाभाऱ्याचे असून मंदिरा समोर दोन उंच दगडी दीपमाळा आहेत. जवळ नगारखान्याची पुरातन इमारत असून 1935 साली या इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला.

प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेले पुरातन शिव मंदिर आहे. किल्ल्याचे खोदकाम करतांना हे शिवलिंग सापडल्याचे सांगितले जाते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराजांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. आज प्रतापगडाचे नाव उच्चारताच आठवते ती महाराजांची आणि अफजलखानची ऐतिहासिक भेट. प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्वं देखील या घटनेमुळेच वाढले. ई.स. 1659 साली झालेल्या या भेटीची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात आली आहे. मोठ्या चतुराईने, धाडसाने, शौर्याने महाराजांनी अफजलखानाचा वध केला.

छत्रपती राजाराम महाराज देखील जिंजीला जात असतांना प्रथम प्रतापगडावर आले होते. 1778 साली नाना फडणीसांनी काही काळ सखाराम बापूंना या गडावर नजरकैद करून ठेवले होते. त्यानंतर 1796 साली दौलतराव शिंदे आणि बाळोबा कुंजीर जेंव्हा नाना फडणीसांवर चाल करण्याच्या उद्देशाने आले त्यावेळी नाना प्रतापगडावर आश्रयाला थांबले होते.

पुढे ब्रिटीश आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धानंतर 1818 ला या गडावर ब्रिटीशांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 मी. उंच असा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नोव्हेंबर 1957 ला करण्यात आले.

या प्रतापगडावर शिवछत्रपती प्रतिष्ठानने प्रशस्त असे सभागृह उभारले आहे. तुळजा भवानीच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर आग्नेय दिशेला अफजल बुरूजा नजीक अफझलखानाची कबर आहे. या ठिकाणी दरवर्षी उरूस भरत असतो. 1957 मधे कुंभरोशी गावापासून ते प्रतापगडाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनासाठी रस्ता तयार करण्यात आला असून प्रतापगडाच्या पायथ्या पर्यंत वाहनाने पोहोचता येतं. येथे एक धर्मशाळा देखील बांधण्यात आली आहे.

प्रतापगडाची तटबंदी आज देखील शाबूत आणि मजबूत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. महाराजांच्या स्मारकाची जवाबदारी सातारा जिल्हा परिषदेवर असून येथील बगीच्याची देखरेख ही वनविभागाची जवाबदारी आहे. प्रतापगडावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा एक वेगळा आणि आल्हाददायक अनुभव प्रत्येकाने घ्यावा असाच आहे.

प्रतापगडावर कसे जाल – How to Reach Pratapgad Fort

  • प्रतापगडावर आपण पुणे आणि मुंबई या दोन्ही मुख्य ठिकाणांवरून जाऊ शकतो.
  • पुणे-महाबळेश्वर हे अंतर 120 की.मी. एवढे असून महाबळेश्वर येथून प्रतापगड अवघ्या 22 की.मी. वर आहे.
  • मुंबई-पुणे-महाबळेश्वर हे अंतर 260 की.मी. चे आहे.
  • मुंबई येथून गोवा मार्गाने-पोलादपूर-प्रतापगड हे अंतर 218 इतके आहे.
  • सातारा हे नजीकचे रेल्वे स्थानक असून रेल्वेने यायचे झाल्यास सातारा येथे उतरून प्रतापगड ला येता येईल.
  • सातारा-महाबळेश्वर अंतर 57 की.मी.
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here