दीर्घायुषी होण्याचं रहस्य जाणून घ्यायचंय? नक्की वाचा या टिप्स…

Tips to Live Longer in Marathi

तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत…

पर्याय क्रमांक एक – बऱ्याच व्याधींनी ग्रस्त अल्पायुष्य जगायचं

पर्याय क्रमांक दोन – व्याधीमुक्त दीर्घायुषी व्हायचं

हा लेख वाचणारी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती, जी आयुष्यावर प्रेम करते ती स्वप्नातही पर्याय क्रमांक एक निवडणार नाही…

तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात फार नव्हे पण थोडाफार बदल करून तुमच्या निरोगी आयुष्यात तुम्ही अगदी सहजतेने वाढ करून आनंदी आणि दीर्घायुषी सोनेरी वर्ष जगू शकता.

या लेखात काही महत्वपूर्ण टिप्स देत आहोत ज्याने तुमची वार्धक्याकडे होणारी वाटचाल ही धीम्यागतीने होईल आणि आपण दीर्घायुषी व्हाल…

दीर्घायुषी होण्याचं रहस्य जाणून घ्यायचंय? नक्की वाचा या टिप्स… – Tips for Long Life

Tips for Long Life

विचारात बदल करा:

सर्वात आधी वाढत्या वयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. हातातून वय निसटत चाललंय असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा ज्ञान आणि दृष्टीकोन मिळवण्याची एक सुवर्णसंधी मला मिळाली आहे असा विचार करण्यास सुरुवात करा.

एका अभ्यासाअंती हे सिद्ध झालंय की वाढत्या वयाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहणारी व्यक्ती हि वृद्धत्वाकडे नकारात्मक दृष्टीकोनाने पाहणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्तकाळ तरुण राहते.

शिवाय ज्या व्यक्तीं स्वतःला  मूळ वयापेक्षा आपण कमी वयाचे आहोत असे समजतात त्या व्यक्ती उशिरा वृद्ध होतात.

जेवणात दह्याचा समावेश अवश्य करा:

आपल्या रोजच्या आहारातून जर तुम्हाला पुरेशी प्रथिनं मिळत नसतील तर अश्या वेळी तुमचं शरीर ती प्रथिनं तुमच्या हाडातून मिळवून आपली गरज भागवतं.

अश्या अवस्थेत हाडांशी तडजोड केल्यासारखे होते, आणि यातून तुम्हाला Osteoporosis (हाडांची ठिसूळता) या आजाराला सामोरे जावे लागू शकते.

19 वर्षांवरील वयोगटातील तरुणांना रोज 1000 मिलीग्राम आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींना 2000 मिलीग्राम Calcium ची आवश्यकता असते.

या आजाराचा सामना करायचा नसेल तर प्रत्येकाने आपल्या आहारात दह्याचा समावेश हा करायलाच हवा.

लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्या आहारात दह्याचे सेवन आवर्जून करावे.

आयुष्यात ध्यानधारणेला प्राधान्य द्या:

जीवनात तीव्र स्वरूपाचे ताणतणाव तुमचं आयुष्य 9 ते 17 वर्षांनी कमी करतात…आणि ही धोक्याची घंटा ठरू शकते.

ध्यानधारणेमुळे तुमचा ताणतणाव बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे रोज आपल्या व्यस्त जीवनातून स्वतःकरता थोडा वेळ काढून ध्यान केल्यास Stressrelease होईल.

खरंतर ध्यान करणे हि आपली फार जुनी संस्कृती असून पूर्वीच्या ऋषीमुनींच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यातच तर दडलेले आहे.

पण आज आपणच आपली पुरातन संस्कृती विसरत चाललो आहोत.

त्यामुळे ध्यानधारणेचे महत्वं ओळखून आपल्या तणावपूर्ण बनत चाललेल्या आयुष्यात त्याला महत्वपूर्ण स्थान द्या.

श्वासावर नियंत्रण मिळवा:

मनुष्यापेक्षा कासव हा अत्यंत दीर्घ श्वास घेतो…व्हेल मासा देखील यामुळेच दीर्घायुष्य जगतो. वृक्षांमध्ये वड, पिंपळ देखील अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहातात ते दीर्घ श्वासोश्वासामुळेच.

त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवल्यास दीर्घायुष्याचे दान आपल्याला नक्कीच मिळू शकते.

योगाभ्यासात वायू ला प्राण म्हणण्यात आले आहे, दिर्घायुष्याकरता शुद्ध वायू मिळणे अत्यावश्यक मानण्यात आले आहे.

तुम्ही रहात असलेल्या शहरात अधिक प्रमाणात वायू प्रदूषण असल्यास त्यापासून वाचण्याचे आपण आवर्जून प्रयत्न करायला हवेत. अन्यथा चांगला आहार आणि योग्य व्यायाम करून देखील तुम्ही उत्तम स्वास्थ्य प्राप्त करू शकणार नाही.

आपल्या घराच्या अवतीभवती अधिकाधिक वृक्ष लागवड करा. तुमचे आयुष्यमान वाढविण्यात वड पिंपळ हे वृक्ष महत्वपूर्ण भूमिका बजावतात. रोज तुळशीचे एक पान अवश्य खा.

सूर्यप्रकाशाचे महत्वं ओळखा:

डॉ. वेंडी रॉबर्ट या जगप्रसिद्ध त्वचारोग तज्ञांच्या मते सूर्यप्रकाशाचा योग्य प्रमाणात लाभ घेतल्यास चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व येत नाही.

खरं पहाता 90% वृद्धत्व हे इतर अनेक कारणांमुळे येतं आणि त्यातले महत्वाचे कारण म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश थेट आपल्या त्वचेवर पडणे.

याला प्रतिबंध घालण्याकरता आपण सनस्क्रीन लोशन वापरून आपल्या त्वचेची योग्य तऱ्हेने काळजी घेऊ शकता.

सकाळची सूर्याची किरणं स्वतःवर पडूद्या, संपूर्ण शरीराला त्याचा लाभ मिळूद्या यामुळे तुमची त्वचा चिरतरुण रहाण्यास मदत मिळेल पण तीव्र स्वरूपाच्या सूर्यप्रकाशापासून स्वतःची काळजी घ्या.

सनग्लासेस वापरा:

आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक परिणामांपासून वाचाविण्यासोबतच आपल्या डोळ्याचं संरक्षण करण देखील तितकंच महत्वाचं आहे.

यासाठी नेहमी तीव्र उन्हात बाहेर पडतांना सनग्लासेसचा वापर अवश्य करावा.

सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक असते म्हणून सनग्लासेस निवडतांना देखील चांगल्या प्रतीचे निवडावे.

पाण्याचा उपयोग:

पाणी म्हणजे जीवन! हे तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. पाणी हे आपल्या शरीराकरता अत्यावश्यक स्त्रोत आहे. त्याच्या योग्य सेवनाने आपली त्वचा तरुण रहाण्यास मदत मिळते.

आयुर्वेदानुसार पाण्याचे सेवन केल्यास रक्तदाब, अपचन, आणि असंख्य आजारांपासून मुक्तता मिळू शकते. शिवाय पाणी आपल्या शरीरातील हाडं, मस्तिष्क, आणि हृदयाला देखील मजबूत बनविण्यात मोलाची भूमिका बजावतं.

पाणी पितांना पितळ, काच, आणि तांब्याच्या भांड्यातून प्यावे. पाणी कमीही पिऊ नये आणि अतिरिक्त देखील पिऊ नये, पितांना ते योग्य प्रमाणात आणि बसून प्यावे.

योग्य आणि सकस आहाराचे सेवन:

उत्तम,सात्विक आणि सकस आहार सेवन करण्याऐवेजी आजकाल फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक, या गोष्टींकडे तरुणाईचा आणि एकंदरीतच समाजाचा कल वाढलेला दिसून येतो.

त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, अपचन, शरीराला आलेले जडत्व, या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतायेत. निरोगी आणि दिर्घायुष्य हवे असल्यास आपल्या आहार विहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

जेवणाने केवळ आपली भूक भागते असे नव्हे तर या आहाराचा प्रभाव आपल्या तनामनावर आणि मेंदुवर देखील पडत असतो. ‘जसे खाल तसे दिसाल’ हि म्हण त्यावरूनच तर पडली आहे.

शक्यतो सात्विक आहार घ्या… आणि आठवड्यातून एकदा उपवास करा.

व्यायामाचे महत्वं वेळीच ओळखा:

बैठे काम करणाऱ्यांपेक्षा कष्टाचे आणि शारीरिक हालचाल करणाऱ्यांचे आयुष्य जास्त निरोगी आणि दीर्घायू होते असे एका संशोधना अंती पुढे आले आहे. जर तुम्हाला बैठे काम करणे नित्याचेच असेल तर अश्यावेळी मधून उठत जा, शारीरिक हालचाल करत जा कारण शरीराचे चलनवलन होत राहावयास हवे.

तुम्हाला झेपेल, पटेल, रुचेल असा व्यायाम नित्यनेमाने करायची आपल्या शरीराला सवय लावा. रोज फिरायला जाणे, योगाभ्यास करणे हे आपल्या शरीरासोबतच मनाला देखील कायम ताजेतवाने ठेवते.

रोज जसे आपण न विसरता जेवण करतो, अगदी तसच न चुकता व्यायाम हा करायलाच हवा. त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहून तुम्हाला दीर्घायुष्याचा लाभ मिळेल.

गोड पदार्थांचे सेवन प्रमाणात करा:

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ताणतणावामुळे आणि अयोग्य आहार सेवन केल्याने कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला मधुमेहाचा सामना करावा लागतोय.

त्यामुळे आहारविहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात.

आपल्या खाण्यात गोड पदार्थांचा समावेश जितका कमी ठेवता येईल तेवढा कमी करावा…

गोड पदार्थांची आपल्या शरीराला तेवढी आवश्यकता नसते. उलट या पदार्थांनी आपल्या शरीराचे नुकसान अधिक प्रमाणात होत असतं. त्यामुळे आपल्या जिभेचे जास्त लाड न पुरवता तोंडावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे.

हिरवं हिरवं खां:

आपल्या जेवणात नियमित कच्चा भाजीपाला आवर्जून सेवन करत जा…

अनेक प्रथिनांचा यात समावेश असल्याने सलाद म्हणून या गोष्टी नेमाने सेवन करायला हव्यात.

या व्यतिरिक्त मोड आलेली कडधान्य देखील अवश्य आहारात घ्यायला हवी. आणि आपल्या घरातील लहानमुलांना बालपणापासूनच या आहाराचं महत्वं पटवून देणं हि घरातील वडीलधारी मंडळींची जवाबदारी आहे.

तणावपूर्ण आयुष्य जगू नका:

असं म्हणतात ज्या समस्येचं निराकरण होऊ शकतं त्याचा जास्त विचार का करायचा…आणि जी समस्या सोडवली जाणार नाही त्याचा विचार करून काय उपयोग?

तणावपूर्ण आयुष्य तुमचे आयुर्मान 9 ते 17 वर्षांनी कमी करतं, असं एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे.

आजकालच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या आयुष्यात प्रत्येकाला नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे…

तरीदेखील जास्त तणावपूर्ण आयुष्य जगणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

म्हणून ताणतणावा पासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि निर्मळ, स्वच्छ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा:

आज आपण आपलं आयुष्य मोठमोठ्या आणि हर तऱ्हेच्या प्रदूषणाने व्यापलेल्या शहरांमध्ये व्यतीत करत आहोत.

नुसता चांगला आहार विहार घेतलात आणि वायूप्रदूषणाने भरलेल्या वातावरणात जगत राहिल्यास अखेर काय होणार? नानाविध आजारांना आपसूक आमंत्रण दिल्यासारखेच होणार.

रोज दैनंदीन आयुष्य जगणं जरी अपरिहार्य आहे तरी देखील जेंव्हा जेंव्हा सवड मिळेल तेंव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जरूर वेळ घालवा.

त्यामुळे प्राणवायूने भरलेल्या शुद्ध वातावरणाचा तुमच्या शरीराला लाभ मिळेल.

निसर्गाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आपल्या शरीराला अनेक चांगल्या गोष्टींचा लाभ मिळतो.

मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवा:

सुखी आणि दिर्घायुष्य जगण्याचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा मूलमंत्र म्हणजे आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.

आपल्या आरोग्यात आणि आयुर्मानात आपली मित्रमंडळी आणि कुटुंबीय महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या आप्तेष्टांमध्ये आपल्या गतिहीन आयुष्याला सक्रीय बनविण्याची ताकद असते.

तुम्हाला जर दीर्घायुष्य जगायचं असेल तर सामाजिक संबंध दृढ करण्यावर भर द्या. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की तुमचे सामाजिक संबंध घट्ट असल्यास तुमचे वाढलेले वजन देखील कमी होते.

तुमची सिगरेट पिण्याची वाईट सवय देखील सुटू शकते.

त्यामुळे दिर्घायुष्याचा लाभ मिळवायचा असल्यास सामाजिक संबंध दृढ करण्यावर भर द्या.

लग्नं करा:

विवाहामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते. लग्नं केल्यानं अकाली येणाऱ्या मृत्यूची शक्यता 15% कमी होते.

एका संशोधनानुसार विवाहित लोक निरोगी जीवनशैली जगतात याव्यतिरिक्त अविवाहित लोकांना चिंता आणि नैराश्याने ग्रासले जाण्याची भीती असते.

पण या निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्याकरता आपला जोडीदार हा प्रेमळ आणि समजूतदार असणं देखील आवश्यक आहे.

स्वतःला चॉकलेटची ट्रीट द्या…:

डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आपल्या मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह यामुळे वाढतो, उच्च रक्तदाब कमी होतो, आणि मेंदूला येणाऱ्या स्ट्रोक ची शक्यता चॉकलेट खाल्ल्याने बऱ्याच प्रमाणात कमी होते.

पण हे चॉकलेट खाण्याआधी त्यात 70% कोकोआ असल्याची खात्री करा. आणि दिवसातून थोड्या प्रमाणात का होईना चॉकलेट नक्की खा.

सात तास नक्की झोपा:

आपल्या शरीराला सात तासांची झोप अवश्य द्या!

एका संशोधनानुसार 7 हा जादुई आकडा आहे.

त्यापेक्षा कमी म्हणजे 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा रक्तस्त्राव  होण्याचे प्रमाण हे दुप्पटीने वाढते.

शिवाय नऊ तास आणि त्यापेक्षा अधिक झोप घेणाऱ्यांना देखील हा धोका आहे.

त्यामुळे कमी किंवा जास्त झोप न घेता 7 तास आपल्या शरीराला अवश्य झोप आणि आराम द्या.

दीर्घायू होण्यासाठी प्राणी पाळा:

पाळीव प्राणी पाळल्याने आपल्या आरोग्याला अनेक चांगले फायदे सांगण्यात आले आहेत.

पाळीव प्राणी घरात वावरल्याने तुमचा ताण बराच कमी होतो, शिवाय रक्तदाब नियंत्रणात राहतो, तुमची प्रतिकारशक्ती वाढते, मनोवृत्ती सुधारते, या शिवाय पाळीव प्राणी घरात असल्याने हृदयरोगाने मृत्यू येण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

तज्ञांच्या मते आपल्याला मिळणारे दिर्घायुष्य हे 10% आपल्याला मिळणाऱ्या जीन्सवर (अनुवांशिकता) अवलंबून असतं आणि 90% आपल्या हातात असतं.

अधिक काळ जगण्याकरता आणि अधिक निरोगी जगण्यासाठी वर दिलेल्या टिप्स ला आपल्या आयुष्यात नक्की अंगीकारा. आणि जीवनात होणारे चांगले बदल अनुभवा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top