When You’re Feeling Lonely
मंडळी एकटेपणाला आपण स्वीकारत नाही, तो आपसूक येतो आपल्या आयुष्यात! कधी वाईट प्रसंग ओढवल्याने म्हणा, बदलीच्या गावी एकट्याला जावे लागल्याने म्हणा, शिक्षणाकरता दूर जावे लागल्याने, आपल्यातून आपली सोबत नियतीने हिरावून घेतल्याने म्हणा, एकटेपणा आपल्या आयुष्यात दाखल होतो.
पण एक सांगू? जोवर आपण त्याला आपल्यापासून दूर करत नाही तोपर्यंत तो जाणार नाही. कुणीतरी येईल आणि आपला एकटेपणा दूर होईल हि वाट बघण्यात काहीही अर्थ नाही. एकटेपणाला दूर सारण्याची जवाबदारी सर्वस्वी आपल्यालाच पार पाडावी लागेल.
पण मंडळी हा एकटेपणा जर दुसऱ्या पद्धतीचा असेल तर मात्र काळजीचं कारण आहे बरं कां!
आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या पद्धतीचा म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला?
मंडळी आपण एकटे असतांना येणारे एकाकीपण वेगळे, पण सगळे असतांना, घोळक्यात असतांना, सण समारंभात असतांना, घरात आपली सगळी जवळची मंडळी असतांना सुद्धा तुम्हाला एकाकी असल्याची जाणीव होत असेल, मनातील भावना व्यक्त करता येत नसतील तर मात्र थोडे काळजीचे कारण आहे असे म्हणावे लागेल.
या लेखातून एकाकीपणा घालवण्याकरता सहज करून पहाता येण्यासारख्या काही टिप्स सुचवीत आहोत … नक्की करून बघा !
एकटेपणा जाणवत असेल तर नक्की करून पहाण्यासारख्या आहेत या 20 गोष्टी… – Things to Do When You’re Feeling Lonely
- बाहेर पडा:
एकटेपणाला दूर करण्या करता अगदी सहज करता येणारी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडा, अगदी सहज एखादी छोटीशी गोष्ट विकत घेण्याकरता दुकानात जाऊन या … त्या वस्तूविषयी शॉप कीपरकडे अगदी उगीचच चौकशी करा आणि घ्या विकत ती वस्तू.
आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष, याने कसे दूर होईल एकाकीपण ? मित्रानो बरेचदा परिस्थितीत थोडा बदल केल्याने सुद्धा आपल्याला फ्रेश वाटते.
- फोन करा:
कुणाला? अहो ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो, समाधान मिळत, निसंकोच पणे मनातल्या भावना व्यक्त करता येतात, जो शांतपणे तुमचे बोलणे ऐकून घेतो, तुम्हाला योग्य असा सल्ला देतो, तुम्हाला नकारात्मक वातावरणातून बाहेर पडण्यास मदत करतो अश्या व्यक्तीला फोन करा. (पण वारंवार, सतत त्याला त्रास देणे योग्य नाही, याची अवश्य काळजी घ्या)
- हळूहळू डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या:
मीत्रानो घरातील अशी जागा शोधा ज्याठीकाणी तुम्हाला सगळ्यात चांगलं वाटतं. अगदी शांत बसा…शक्य असल्यास एखादं चांगलं संगित कानावर पडुदया, अगदी हळूहळू डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या व हळूहळू सोडा. तुमच्या प्रकृतीला मानवेल, झेपेल तसा हा प्रयोग 3 ते 10 वेळेस करायला हरकत नाही. पहा नक्की फ्रेश वाटेल!
- बागकाम करा:
आता तुम्ही म्हणाल हे आणखीन काय सुचवताय? पण मित्रानो झाडं आपले खूप चांगले मित्र होऊ शकतात.
तुम्हाला आवडणारी लहान लहान रोपं आणून कुंड्यांमध्ये लावा. सकाळ संध्याकाळ त्यांना न चुकता आठवणीने पाणी घालत जा, त्यांना वेळोवेळी आवश्यक ती खतं घाला आणि मग बघा किती छान सोबत करतात ते तुम्हाला! अगदी घरातील एखाद्या सजीव सदस्यासारखी …
- स्वतःशी बोला:
बरेचदा एकाकीपणाचं हे देखील महत्वाचं कारण पाहायला मिळतं की इतरांशी सोडा आपण स्वतःशी देखील बोलत नाही, आपण स्वतःशी प्रामाणिक राहावयास हवं.
असं समजा की तुमचं मन एक लहान मुल आहे आणि ते तुमच्यासमोर बसलंय … आपल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करा.
काय चुकलं, का चुकलं, काय अपेक्षित होतं, काय होऊन बसलंय या सगळ्या मनातल्या गोष्टींना स्वतःजवळच व्यक्त करण्यास सुरुवात करा.
हा प्रयोग करून तर पहा! बघा तर खरं काय फरक पडतोय ते.
हा प्रयोग केल्याने तुम्हाला फार हलकं झाल्यासारखं वाटेल. मोकळं वाटेल.
- स्वयंपाक करा:
हो करा स्वयंपाक! सर्वात महत्वाच्या व्यक्तीकरता! कोण? अहो तुम्ही स्वतः … Yes, हा एक उत्तम पर्याय आहे एकटेपणा घालविण्यासाठी. तुम्हाला जो पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो नं, तो बनवायला घ्या अगदी शांततेने कोणतीही घाई न करता. एक एक जिन्नस निवडायला, कापायला वेळ द्या. मंद प्रकाशात Light Music ऐकता ऐकता सगळी तयारी करत हा पदार्थ स्वतःकरता तयार करा. निसर्गाचे आभार माना की आज इतका छान वेळ स्वतःसाठी त्याने मिळवून दिला. बघा हा अनुभव देखील एक सुंदर अनुभूती देऊन जाणारा ठरेल.
- चित्र काढा:
एखादे चित्र किंवा क्राफ्ट तयार करणे म्हणजे स्वतःला व्यक्त करणे च तर असते. एखादे सुरेख चित्र काढायला घ्या.
काय म्हणता! तुम्हाला चित्र काढता येत नाही? अहो मं काय झालं तुम्हाला कुठे ते एखाद्या स्पर्धेकरता काढायचे किंवा तयार करायचे आहे स्वतःकरता काढायचे आहे, स्वतःला व्यक्त करण्याचा तो एक उत्तम पर्याय आहे. घरातील एखादे मासिक उचला, त्यातील एखादे चित्र निवडा, दोन मिनिटं त्याचे शांततेने निरीक्षण करा, दीर्घ श्वास घ्या आणि करा सुरुवात चित्र काढायला.
आणि हो! हे करत असतांना संयम ढळू द्यायचा नाही आणि निराश तर अजिबात व्हायचं नाही.
- चला फिरायला निघा:
एकटे असाल, करमत नसेल तर पायी फिरायला निघणे हा देखील चांगला पर्याय आहे.
एकट फिरायला निघायचं? नाही, स्वतःसोबत फिरायला जायचं.
जर तुम्हाला समुद्र, डोंगरदऱ्या, हिरवागार निसर्ग आवडत असेल तर मं विचारायलाच नको.
तुम्ही मनापासून अनुभवाल तर तो निसर्ग तुमच्याशी बोलतो… तो म्हणतो माणसांनी भरून वाहणाऱ्या या शहरांमध्ये मी एकटाच आहे. बरे झाले तू आलास मला भेटायला.
पण हे अनुभवायला तुम्हाला बाहेर पडावे लागेल. मग पहा तुमचा एकटेपणा कसा दूर पळतो ते.
- सोशल मीडिया पासून दूर राहा:
आता हे Title वाचून तर तुम्ही माझा रागच करायला लागाल. हे काय सांगतोय हा. अन्न वस्त्र निवाऱ्या एवढी गरजेची झालेली सोशल मीडिया! आणि हिच्यापासून हा दूर राहण्यास सांगतोय.
पण खरंच सांगतो आपण टाकलेल्या post ला like न मिळणे, त्यावर कुणी comment न करणे, थोडक्यात आपली कुणी दखल न घेणे हे आजकाल नैराश्य येण्याचे महत्वाचे कारण असल्याचे डॉक्टर सुद्धा मानतात. तुम्ही या गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात वापर करत असाल, त्याच्या आहारी जात असाल तर वेळीच सावध व्हा. धोक्याची घंटा ओळखा.
- आपले फोटो बघा आणि त्यांना व्यवस्थित रचां
खरंतर असं केल्याने जास्त दुखः होईल…रडू कोसळेल … पण थांबा भावनांचा हा आवेग ओसरू द्या… थोडा वेळ द्या… मग पहा तुम्हाला आनंद गवसेल, तो आनंद तुम्हाला त्या दिवसांमध्ये घेऊन जाईल जेंव्हाचे ते फोटोग्राफ्स आहेत. त्या आठवणी तुम्हाला नक्कीच सुखद अनुभव देणाऱ्या असतील, क्वचित दुखः देणाऱ्याही असतील. या फोटोंना पहा, त्यांना व्यवस्थित लावा. चांगला, सुखाचा काळ लक्षात ठेवा, एकटे आहात किंवा घोळक्यात आहात हे महत्वाचे नाही, महत्वाचं आहे तुम्ही आनंदी राहणं.
- सिनेमाला जा:
कारण थियेटर मध्ये जेंव्हा तुम्ही तिकीट काढून सिनेमा पाहायला जाता त्यावेळी तुम्ही एकटे नसता. समूहाने तो चित्रपट पहाता. विनोदी प्रसंग आला तर सगळ्यांसोबत खळखळून हसता आणि भावनात्मक दृश्यात इतरांसमवेत तुमच्या डोळ्यांच्या कडा देखील पाणावतात. त्यामुळे समूहासमवेत भावना व्यक्त करतांना तुम्हाला एकाकीपण जाणवत नाही . त्यामुळे सिनेमाला जाणे हा एकटेपणा घालवण्याचा एक उत्तम पर्याय ठरतो.
- व्यायाम करा:
“एका निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास असतो” हे केवळ पुस्तकी वाक्य नसून वास्तविकतेच्या पातळीवर देखील हे वाक्य तंतोतंत लागू पडतं. तुम्हाला जो व्यायाम आवडतो तो करा. पायी चालणे, धावणे , योगा अगदी कोणताही व्यायाम जो करण्यास तुम्ही स्वतःला comfortable समजाल तो करा. लक्षात ठेवा ! आपल्याला उत्तम शारीरिक स्थिती प्राप्त झाल्यानंतर आपले मानसिक बळ देखील उंचावते.
- आपला छंद ओळखा:
अर्थात आपल्याला नेमकं काय आवडतंय याचा शोध घ्या. जगाला दाखवण्याकरता नव्हे तर तुमच्या स्वतःकरता हा शोध घेणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. त्या छंदाकरता रोज जरी जमलं नाही तरी आठवड्यातून थोडा वेळ काढा. म्हणजे तुम्ही रोजच्या गर्दीतून स्वतःला ओळखण्यासाठी वेळ काढा असं मला म्हणायचंय. तुमचा छंद तुम्हाला गर्दीपासून वेगळा करतो आणि स्वतःची ओळख करून देण्यात सहाय्य करतो. प्रख्यात लेखक पु.लं. देशपांडे असं म्हणतात, की पोटापाण्यासाठी अवश्य काम करा परंतु एखादा छंद नक्की जोपासा कारण काम तुम्हाला जगवेल पण तुमचा आवडता छंद तुम्हाला जगण्याचा अर्थ समजवून सांगेल.
- मंदिरात जा:
तुम्ही धार्मिक आहात किंवा नाही हा मुद्दा येथे महत्वाचा नाही. पण धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर, तेथील शांत, निवांत वातावरणामुळे, त्या वातावरणातील सकारात्मकतेमुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहाण्यास मदत मिळते. मंदिरात गेल्यानंतर आपण भगवंतासमोर नतमस्तक होतो, एकतर्फी का होईना त्याच्याशी संवाद साधतो, आपलं मन आतल्या आत त्याच्यासमोर मोकळं करतो. त्यामुळे होतं काय की आपल्या पाठीमागे कुणीतरी आपला पाठीराखा आहे या भावनेने बळ मिळतं.
- प्रवासाला निघा:
फिरायची आवड असेल तर प्रवास हा तुमच्या एकाकीपणाला घालवण्याचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण प्रवासात तुम्ही एकटे नसता, बोलण्याकरता आजूबाजूला भरपूर मंडळी असते, शिवाय प्रवासात जो गाईड तुमच्या सोबत मार्गदर्शनासाठी दिलेला असतो तो तुमच्या कोणत्याही मूर्खासारख्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देण्यास बांधील असतो…आहे न मज्जा ! कधी निघताय मं प्रवासाला ?
- घ्या हातात कॅमेरा:
कारण कॅमेरा हा माणसाला कधीही एकाकी राहू देत नाही. शिवाय तुमचे शहर देखील फोटोजेनिक आहे हे सगळ्यांना दाखवून देण्याची तो आपल्याला सुवर्ण संधी मिळवून देतो. शिवाय आपण काढलेल्या selfie इतर आकर्षित झाले तर ‘सोने पे सुहागा’ नाही का ? तेंव्हा एकाकीपण घालवण्यासाठी हातात कॅमेरा घेण्यास काय हरकत आहे ?
- प्राणी पाळा:
एकाकीपणा घालाविण्याकरता मित्रानो हा देखील उपाय करण्यासारखा आहे. घरात प्राणी पाळल्यास त्यांची दिनचर्या सांभाळण्यात आपला बराच वेळ खर्ची होतो त्यामुळे आपल्याला एकटेपण जाणवत देखील नाही. आणि सतत आपल्यासोबत कुणीतरी आहे ही भावना आपलं मनोबल वाढवते. शिवाय dog ला जेंव्हा आपण बाहेर फिरवण्याकरता निघतो तेंव्हा इतर माणसं जी प्राण्यांना फिरायला घेऊन निघाली असतात त्यांच्याशी ओळखी होऊन नवनव्या लोकांशी आपला संपर्क वाढतो.
- गायन:
गाणं म्हणणं हा सुद्धा एकाकीपणा घालविण्याचा प्रभावी उपाय आहे. गाण्याने आपला मूड चांगला राहतो. कराओके play करा आणि बिनधास्त आपल्या आवडीचे गाणे म्हणा ! पहा तुमच्या mood मध्ये कसा Confidence येतो ते… कारण गाणं आपल्याला जगणं शिकवतं, ते आपल्याला प्रेरणा देतं.
- वाचन-लेखन:
एकाकीपणा घालवण्यासाठी आवडत्या लेखकाची पुस्तकं वाचण हा देखील चांगला पर्याय आहे, खरंतर वाचन हे सगळ्यांनीच करायला हवं कारण त्याने आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्या व्यक्तीमत्वात चांगला बदल घडतो.
आपल्या मनात आलेल्या विचारांना कागदावर उतरवून आपण लिखाणाला देखील सुरुवात करणं चांगलं ठरू शकतं. एकाकीपण दूर करण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे.
- एकाकीपणाची जास्तच भीती वाटू लागल्यास एखाद्या उत्तम तज्ञाची मदत घ्या. त्यामुळे एकाकीपणा दूर करण्यास त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा आपल्याला जास्त लाभ मिळू शकतो.