राणी येसूबाई

Maharani Yesubai

आपल्या स्वकर्तुत्वाने आणि गुणांच्या बळावर तेजाने उजळून निघणारी मराठ्यांच्या इतिहासातील दुसरी राजस्त्री म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी ‘येसूबाई’ होय. (छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी)

संभाजी महाराजांची एकूण कारकीर्द हि जणू संकटांची मालिकाच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर मराठ्यांच्या स्वराज्यात केला गेलेला स्वामीद्रोह…विषप्रयोगाने त्यांना संपविण्याचा कुटील डाव…मातोश्री सोयराबाई यांची कट-कारस्थानं या घटनांमुळे संभाजी महाराजांचा आपल्या माणसांवरील विश्वास पूर्णतः उडाला होता.

याच दरम्यान 1681 साली औरंगजेबाने दिल्ली येथून निघून मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्याचे मनसुबे आखले.

या प्रतिकूल परिस्थितीचा लाभ घेत पश्चिम किनाऱ्याकडील सिद्दी आणि पोर्तुगीज सुद्धा स्वराज्याच्या प्राणांवर उठले.

संपूर्णपणे आपल्या विरोधात जाणाऱ्या परिस्थितीत त्यादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेणारी…

सुख-दुःखात सहभागी होणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी राणी येसूबाई.

राणी येसूबाई – Maharani Yesubai Information

Maharani Yesubai Information

येसूबाई या कोकणातील शृंगारपुरच्या पिलाजी शिर्के यांची कन्या. आपली सून म्हणून स्वतः छत्रपती शिवरायांनी त्यांची निवड केली होती. महाराजांची निवड योग्य असल्याचे येसूबाईंनी आपल्यातील कौशल्याने सिद्ध केले, दिवसरात्र युद्ध प्रसंग उभा असतांना स्वराज्याच्या अंतर्गत कारभारात त्यांनी आपले पती संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लाऊन जवाबदारी पेलली. “श्री सखी राज्ञी जयति” असा शिक्का येसूबाईंना बहाल करून स्वतः संभाजी महाराजांनी त्यांना शिक्के-कट्यारीचे पद दिले होते.

औरंगजेबाने अत्यंत क्रूरतेने हाल-हाल करून छत्रपती संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर खऱ्या अर्थाने येसूबाईंच्या आयुष्यात कसोटीचा प्रसंग उभा ठाकला. वज्राघाता प्रमाणे अनपेक्षित दुःख नियतीने त्यांच्या पदरी टाकले. संभाजी महाराजांच्या अकाली क्रूर निधनाने त्यांना शोक व्यक्त करण्याचा देखील अवधी दिला नाही कारण रायगडाला म्हणजेच मराठ्यांच्या स्वराज्यालाच औरंगजेबाने वेढा घातला होता.

रायगडावर त्यावेळी जेवढी राजकुटुंबातील मंडळी उपस्थित होती, त्या सर्वांनाच बंदिस्त करण्याचा औरंगजेबाचा कुटील डाव होता.

येसूबाई, बाळ शाहूराजे, राजाराम महाराज, ताराबाई, व कुटुंबातील इतर मंडळी त्यावेळी गडावर उपस्थित होती.

आता पुढे काय? हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत होता.

Maharani Yesubai Mahiti

बाळ शाहूराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवून राज्यातील सगळी सूत्र राणी येसूबाई स्वतःच्या हाती घेतील असा सगळ्यांचा कयास होता, पण मराठा साम्राज्याच्या राणी येसूबाईंनी वेगळा पर्याय निवडून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपले पुत्र बाळ शाहूराजेंना गादीवर न बसवता दिर राजाराम महाराजांना गादीवर बसविले आणि त्यांना छत्रपती घोषित केले.

आपल्या राजाचे सिंहासन आपल्या मुलाला न देता दिराला अर्पण करत राणी येसूबाईंनी त्यांना “छत्रपती” बनविले.

त्यांच्या या निर्णयाने त्यांनी निस्वार्थीपणा व त्याग याचा मराठ्यांच्या इतिहासातील एक वेगळाच आदर्श जगापुढे ठेवला.

राजाराम महाराज स्वराज्यातील किल्ल्यांवर फिरते राहून कर्नाटकातील जिंजीला पोहोचले मात्र इकडे मोगलांनी सईबाई आणि त्यांचे पुत्र शाहूराजे यांना कैद केले.

1689 साली त्यांना अटक करण्यात आली आणि येसूबाई मोगलांच्या कैदेत तब्बल तीस वर्ष बंदिवान म्हणून राहिल्या.

या दरम्यान येसूबाईंचे पुत्र शाहूराजे मोगलांच्या कैदेतून 1708 च्या दरम्यान सुटून छत्रपती झाले.

बाळाजी विश्वनाथ या पराक्रमी आणि कर्तबगार पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी केली आणि महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून 1719 साली सुटका केली.

तब्बल तीस वर्ष कैदेत राहिलेल्या येसूबाई अखेरीस मुक्त झाल्या…कैदेतून बाहेर आल्या. मोठ्या कालखंडानंतर आईमुलाची गाठ पडली.

औरंगजेबाच्या तावडीत सापडलेल्या आपल्या मुलाची प्रगती पाहण्याचे…त्याचे राज्य हळूहळू वाढतांना बघण्याचे…मराठ्यांचा झेंडा नर्मदेच्या पल्याड गेलेला पाहण्याचे भाग्य येसूबाईंना लाभले.

पुढे 1731 मध्ये संभाजी महाराजांच्या या राणीचे…येसूबाईंचे निधन झाले…

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here