नरनाळा किल्ला इतिहास

Narnala Fort Information in Marathi

इतिहास प्रेमींना महाराष्ट्रातील किल्ल्यांनी नेहमीच भुरळ पडली असून त्यांना या गडांचे कायम आकर्षण वाटत आले आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहेत अगदी त्याच पद्धतीचे किल्ले अवघ्या महाराष्ट्रात सर्वदूर विखुरले आहेत परंतु इतिहास प्रेमींना त्या किल्ल्यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ते तिथवर आजपर्यंत पोहोचू शकले नाहीत. विदर्भात देखील बऱ्याच पुरातन किल्ल्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे, आणि त्यातलाच एक महत्वाचा आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षित राहिलेला किल्ला म्हणजे अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला होय.

महाराष्ट्रातील एक जिल्हा अकोला..!! आणि या अकोला जिल्ह्यातील एक तालुका अकोट. अकोट तालुका निसर्गरम्य ठिकाणांनी नशीबवान ठरला आहे वारी हनुमान हे ठिकाण असो, की पोपटखेड चे धरण, जवळच असलेला मेळघाट परिसर, सर्वदूर पसरलेली हिरवाई. सातपुड्याच्या पर्वत रांगांमुळे येथे पाऊस देखील भरपूर पडतो. या अकोट तालुक्याच्या उत्तरेला सुमारे 24 की.मी. अंतरावर एक ऐतिहासिक किल्ला पहावयास मिळतो.तो हा नरनाळा किल्ला!

नरनाळा किल्ल्या विषयी माहिती – Narnala Fort Information in Marathi

Narnala Fort Information in Marathi
Narnala Fort Information in Marathi

नरनाळा किल्ला अकोल्यापासून साधारण 60-65 की.मी. अंतरावर असून या गडाच्या पायथ्याशी शहानुर हे गाव वसलेलं आहे. शहानुर गावातील धरण देखील पाहण्यासारखे असून किल्ल्याच्या पायथ्या पासून मेळघाट प्रकल्प असून मेळघाटचं जंगल हे पर्यटकांना कायम खुणावत आलंय. या सातपुड्याच्या डोंगर रांगा लांबवर पसरलेल्या असून दूरवर पसरलेली हिरवळ मनाला आकर्षित करते, आणि या रांगांमध्ये सातपुड्याच्या उंच डोंगरावर नरनाळा हा किल्ला बांधण्यात आला आहे.

जमिनीपासून या गडाची उंची सुमारे 3150 फुट आहे, गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला चढाई साठी थोडा अवघड आहे. हा गड 380 एकरात विस्तीर्ण पसरलेला असून तटबंदीची लांबी 24 मैल इतकी आहे. नरनाळा म्हणून मुख्य किल्ला ओळखला जात असून तेलीयागड व जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व आणि पश्चिम दिशेला बघायला मिळतात.

या नरनाळा किल्ल्यावर आपण आता दोन चाकी आणि चार चाकी वाहनाने देखील जाऊ शकतो परंतु कित्येक पर्यटक गडावर पायी जाणेच पसंत करतात. किल्ल्यावर जातांना वनविभागाची एक चौकी लागते याठिकाणी जातांना आणि येतांना नोंद करून रीतसर परवानगीने  आपल्याला नरनाळा पहायला जाता येतं. किल्ल्यावर राहण्याची परवानगी नसून तशी सोय देखील नाही.

नरनाळा किल्ल्याचा इतिहास – Narnala Killa chi Mahiti

नरनाळा किल्ला कुणी आणि कधी बांधला या विषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पण गडाविषयी असलेले स्थापत्य आणि ऐतिहासिक पुरावे पहाता ‘गोंड राजांनी‘ हा किल्ला बांधला असावा असा अंदाज आहे. नरनाळा किल्ल्यावर लगेच लक्ष वेधून घेणारे नागपूरकर भोसले काळातील तुळशी वृंदावन आणि मारुतीरायाचे देऊळ आहे.

गडावर राम तलाव आणि धोबी तलाव यांसहित तब्बल 22 तलाव आहेत. किल्ल्यावरचे बुरुज मोजायला निघालात तर तब्बल 64 बुरुज भरतात. मजबूत तटबंदी आणि दुर्गम पहाडांच्या आधाराने हा किल्ला सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडच्या विशेषतः माळव्यातुन येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. नरनाळा किल्ल्याविषयी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

नरनाळा किल्ल्यावर काय पहाल – Tourist Place on  Narnala Fort 

नरनाळा किल्ल्यावर प्रवेश करतांना एकूण पाच दरवाजे लागतात. या दरवाज्यांना पाहून गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना येते. सुरुवातीला नजरेस पडतो तो शहानुर दरवाजा त्यापुढे आहे मोंढा दरवाजा.त्यानंतर अतिशय सुरेख कलाकुसर केलेला महाकाली दरवाजा त्या काळातील कलात्मकतेचा परिचय करून देतो.

या दरवाज्यातून आत गेल्या नंतर आपण किल्ल्यावर पोहोचतो. गडाच्या मध्यभागी सक्कर तलाव नावाचा मोठा जलाशय आहे. या तलावात बाराही महिने पाणी असते. औषधी गुणांसाठी या तलावाची ख्याती आहे, असं म्हणतात की जर कुणाला कुत्रा चावला तर त्याने या तलावातील पाण्याने अंघोळ करून इथे असलेल्या दर्ग्यावर गुळ फुटाणे वाहून लगेच गड उतरावा आणि उतरतांना मागे वळून पाहू नये, त्याने बाधा उतरते. (आख्यायिका)

गड आज जीर्णावस्थेत उभा असला तरी देखील राणी महाल आणि मशीद अस्तित्वात आहे. येथे उभे असलेले स्तंभ त्याकाळातील भव्य सभामंडपाची जाणीव करून देतात. सरळ पुढे गेल्यावर तेला-तुपाच्या मोठ्या टाक्या लागतात  युद्धाच्या वेळी तेल-तूप साठवण्यासाठी या टाक्यांचा उपयोग करण्यात येत असे.

गडावर मोठ्या आकाराची ‘नऊगजी तोफ’ आहे, अष्टधातूची ही तोफ इमादशहाच्या काळात किल्ल्यावर आणली गेली असावी. या तोफेवर पारशी भाषेत लेख लिहिला असून तोफेचे तोंड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर गावाच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चौफेर दाट चंदनाचे खोरे असून सागाची आणि चंदनाची असंख्य वृक्षवल्ली इतस्ततः पसरलेली आहे. नरनाळा किल्ल्याला 7 जून ई.स. 1916 ला राष्ट्रीय सरंक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

नरनाळा किल्ल्यावर कसे जाल – How to Reach Narnala Fort

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा अकोला शहराच्या मधून गेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडले आहे. खाजगी वाहनाने देखील नरनाळा किल्ला पहायला जाता येऊ शकतं. अकोला अकोट हे अंतर 45 की.मी. आणि अकोट नरनाळा अंतर 22 की.मी. आहे. शहरातील धावपळी पासून दूर आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवसाची सहल नरनाळा किल्ल्यावर सहज होऊ शकते.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here