• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताले चटके तवा मियते भाकर.

बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील रसिकांपैकी कुणी ऐकल्या, वाचल्या नसतील असं होणार नाही. तसं कुणी असेलही तरी या दोन ओळींमध्ये संसाराचा नेमका अर्थ जो किती सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितला आहे, तो मात्र संसारात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लागू होतांना आपल्याला दिसतो.

बहिणाबाई चौधरी माहिती – Bahinabai Chaudhari Information in Marathi

नावबहिणाबाई चौधरी
जन्म 11 ऑगस्ट 1880
वडिलांचे नाव उखाजी महाजन
आईचे नाव भिमाई महाजन
पतीचे नावनथूजी खंडेराव चौधरी
मृत्यू3 डिसेंबर 1951

बहिणाबाई यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 ला खानदेशातील जळगाव पासून 6 की.मी. असणाऱ्या असोदे या गावी झाला त्यांच्या वडीलांचे नाव उखाजी आणि आईचे भिमाई महाजन होते.
वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह जळगाव येथील नथूजी खंडेराव चौधरी यांच्या बरोबर झाला. मुलगी काशी आणि ओंकार आणि सोपान हि दोन मुले असा त्यांचा परिवार.

घरची कामे व त्यानंतर शेतीची कामे करणे असा त्यांचा दिनक्रम चालत असे. बहिणाबाईंच्या वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. वैधव्य आल्यामुळे तीन मुलांसह पुढील आयुष्य काढणे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला पण त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करत संसाराचा गाडा ओढला.

बहिणाबाईंच्या कविता – Bahinabai Poems

शेतात काम करत असतांना ऊन, वारा, पाऊस, पशु-पक्षी अशा अनेक गोष्टींसह त्यांचे निसर्गाशी नाते जोडले गेले आणि त्यांना ओव्या, कविता, गाणे सुचू लागले.

जात्यावर काही दळत असतांनाही सहज सुचलेल्या ओव्या त्या गात असत. आजू बाजूला असणाऱ्या शेजारी बायांना सुद्धा त्यांच्या या सहज सुचण्या बाबतीत नेहमीच अप्रूप वाटत त्या बहिणाबाईंचं कौतुक करीत असत.

बहिणाबाई स्वत: निरक्षर होत्या तरी त्यांची कवितेतील अफाट कल्पनाशक्ती आणि विद्वानांनाही लाजवेल असं तत्त्वज्ञान वाचून अनेकजण आजही थक्क होतात.

बहिणाबाईंच्या कवितेतील सहजता, साधेपणा, आणि त्यातून सांगितलेले तत्वज्ञान त्यांच्या कवितेला, गाण्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.

त्यांच्या एका कवितेत माणसाच्या मनाची अवस्था, त्याचे असणारे अनेक कंगोरे कसे असतात ते आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या गोष्टी, घटना आणि उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सहज सुचून जातं….

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर.
मन जह्यरी जह्यरी त्याचे न्यारेच तंतर,
अरे इचू साप बारा त्याले उतारे मंतर.

पृथ्वीवरचा सर्वांत हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याला बोलता येते, वाचता येते आणि विचारही करता येतो. इतके असूनही अनेकजण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळतांना आपल्याला दिसतात. एका सुगरण पक्ष्याचे उदाहरण घेऊन किती सुंदर विचार बहिणाबाई मांडतात.

अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला,
देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला.
तिची उलूशीच चोचं, तेच दात तेच ओठ,
तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोटं.

बहिणाबाईंच्या रचना या खानदेशातील लेवा गण बोलीतील आहेत. बोलीभाषेत त्या रचना असल्यामुळे त्यात गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसूकच जाणवतो.

बहिणाबाईंची कुठल्याही गोष्टीचे निरीक्षण करून ते कवितेत उतरविण्याची शैली किती वेगळी आहे हे आपणास दिसून येते.

धरीत्रीच्या कुशीमंदी बीयबियानं निजली,
वऱ्हे पसरली माती जशी शाल पांघरली.

शेतात पेरणी झाल्यानंतर बियाणं जमिनीत निजण्याची आणि मातीची शाल पांघरल्याची कल्पना बहिणाबाईंनी किती सुंदररित्या मांडली.

Bahinabai Chaudhari Kavita

सासुरवाशीन पोरीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर, माहेरच्या प्रत्येकच गोष्टीविषयी तिला एक वेगळाच आनंद मग तो माहेरचा माणूस असो की वस्तू. तिला भारी आनंद आणि माहेरी जायचं म्हटलं कि तिच्या आनंदाला पारावारच उरत नाही. तिथे जायच्या आधीच डोळ्यांसमोर उभं राहतं माहेर, माहेरची माणसं, वाहणारी नदी आणि माहेराला जाणारी वाट…!

या ओळींच्या माध्यमातून तर जणू प्रत्येक सासुरवाशीन पोरीचं प्रतिनिधित्वच त्या करतात.

लागे पायाला चटके
रस्ता तापीसानी लाल
माझ्या माहेरची वाट
माले वाटे मखमल

जीव व्हतो लाही लाही
चैत्र वैसखाच उन
पाय पडता लौकीत
शीन जातो निंघीसन

तापीवानी नाही थडी
जरी वाहे थोडी थोडी
पाणी लौकिचं नित्तय
त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप
सांगे कानामंधी वारा
माझ्या माहेरच्या खेपा
लौकी नदीले इचारा

आजच्या काळात लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. माणूस समाजात वावरत असूनही एकाकी होत चालला आहे.

सगळ्यांना सोबत घेऊन पुढे न जाता एकट्याचेच हित साधण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. अशांना बहिणाबाई विचारतात…

मानसा मानसा कधि व्हशील माणूस,
लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस

आयुष्य जगात असतांना तुम्ही कसं जगायला हवे आणि तुम्ही कसे असायला हवे . ते ह्या रचनेत किती सरळ मांडतात…

बिना कपाशीनं उले, त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले, त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्‍यानं हाललं, त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम, त्याले कान म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं, तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं, त्याले हात म्हनूं नहीं

बहिणाबाई ज्यावेळी ओव्या म्हणत असत त्यावेळी बऱ्याचवेळा त्यांचा मावसभाऊ किंवा त्यांचा मुलगा सोपान त्या लिहून ठेवत असत.

About Bahinabai Chaudhari

बहिणाबाई गेल्यानंतर त्यांचा मुलगा सोपानला त्या लिहून ठेवलेल्या कवितांचे कागद सापडले. त्यानंतर ते घेऊन ते अत्रेंपर्यंत पोहचले आणि त्या रचना पाहून अत्रे अवाक् झाले आणि म्हटले ‘हे तर बावनकशी सोने आहे, कुठे होता हा खजिना..?’. बहिणाबाईंच्या मुलाने त्यांना सगळी हकीकत सांगितली.

1952 मध्ये अत्रे यांच्या पुढाकाराने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 1969 ला दुसरी आवृत्ती.

बहिणाबाईंच्या कवितांना साहित्यक्षेत्रात एक वेगळीच ओळख आहे. त्या कविता-ओव्यांमध्ये सर्वसामान्यांचं जगणं अगदी ठळकपणे दिसून येते.

3 डिसेंबर 1951 ला बहिणाबाई यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे साहित्याला दिलेले योगदान कायम आठवणीत रहावे या उद्देशातून जळगाव येथे स्थित असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव हे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असे ठेवण्यात आले.

त्यांचा मुलगा सोपान चौधरी यांनी जळगाव येथील बहिणाबाई राहत असलेल्या घरात त्या वापरत असलेल्या वस्तूंचे संग्रहालय तयार केले आहे.

त्या स्वत: निरीक्षर होत्या, मात्र कवितेच्या माध्यमातून सगळ्यांना जगायचं कसं..? हे त्या शिकवून गेल्या.

माझी मराठीच्या माध्यमातून आपण बहिणाबाई व त्यांच्या कवितांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Bahinabai Chaudhari

प्र. 1. बहिणाबाईंचा जन्म कोठे झाला?

उ. महाराष्ट्रातील असोदे गावात खानदेश प्रांत, जि. जळगाव.

प्र. 2. बहिणाबाईंचे साहित्य कोणत्या स्वरूपाचे आहे?

उ. ओव्या- कवितेच्या स्वरूपातील.

प्र. 3. बहिणाबाईंच्या कविता कोणत्या बोली भाषेत आहेत?

उ. अहिराणीतील लेवा कच बोलीत.

प्र. 4. कोणत्या विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी असे ठेवण्यात आले?

उ. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
June 24, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती - Smt. Draupadi Murmu Information in Marathi पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून...

by Editorial team
June 23, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved