हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती मर्द मराठा हंबीरराव मोहिते

Hambirrao Mohite Mahiti

कोणतेही युद्ध हे एकटा राजा कधीही लढू शकत नाही…त्याला सोबत असते ते त्याच्या मावळ्यांची…प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी, शूर मावळे सोबत असल्यास कोणतही युद्ध जिंकणे अशक्य नाही…छत्रपती शिवरायां समवेत असेच निष्ठावान सोबती होते म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली.

महाराजांच्या मराठा स्वराज्यात असाच एक कर्तबगार पराक्रमी सोबती होता…सरसेनापती हंबीरराव मोहिते…

हंबीरराव मोहिते हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. इसविसन1674 साली त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती मर्द मराठा हंबीरराव मोहिते – Hambirrao Mohite in Marathi

Hambirrao Mohite

हंबीररावांचे घराणे – Hambirrao Mohite Family

रतोजी कोरडे या हंबीररावांच्या पणजोबांनी निजामशाहीत बराच पराक्रम गाजविल्याने निजामशाहीने त्यांना “बाजी” किताबाने सन्मानित केले होते.

त्यामुळे हंबीररावांच्या रक्तातच पराक्रम आणि प्रामाणिकपणा वहात होता.

हंबीरराव हे मूळ कोरडे घराण्यातले. या घराण्यातील तुकोजी कोरडे तळबीड गावाची पाटीलकी सांभाळायचे.

कोरडे घराण्याच्या सोयरिकी घोरपडे आणि घाटगे घराण्यांशी झाल्या व त्याच दरम्यान संभाजी आणि धारोजी कोरडेंचा शहाजी राजांशी जवळून संबंध आला.

कोरडे (मोहिते) घराण्याचे भोसले घराण्याशी निकटचे संबंध – Bhosle’s Family with Mohite Family

पुढे धारोजी कोरडे शहाजी राजांच्या लष्करात सामील झाले. धारोजी आणि संभाजी कोरडे हे त्या सुमारास शूर आणि पराक्रमी सेनानी म्हणून सर्वश्रुत होते.

आदिलशाही फर्मानात त्यांच्या शौर्यगाथा पहायला मिळतात.

स्वराज्य स्थापनेवेळी संभाजी कोरडेंची सहहवालदार म्हणून शहाजी राजांच्या लष्करात नेमणूक होती, पुढे ते कर्नाटकात गेले परंतु जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या कन्येचा सोयराबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजां समवेत लावून दिला. त्यामुळे भोसले घराण्याशी त्यांचे नाते नव्याने निर्माण झाले.

कालांतराने संभाजी कोरडेंच्या (मोहिते) मुलाने हंसाजी मोहितेंनी (हंबीरराव) आपल्या ताराबाई या कन्येचा विवाह राजाराम महाराजांशी लावून दिला. (शिवाजी महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव) यामुळे मोहिते घराणं छत्रपतींच्या अगदी निकटचं घराणं झालं.

संभाजी मोहितेंचे चिरंजीव म्हणजे हंसाजी अर्थात हंबीरराव मोहिते…

हंबीरराव हा किताब – Awarded Hansaji Mohite with the Honour “Hambirrao

छत्रपती शिवरायांनी हंसाजिंना त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन ‘हंबीरराव’ हा किताब दिला होता व आपल्या सैन्याचे प्रमुख सेनापती म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

हंबीररावांच्या आधी प्रमुख सेनापतीपदी प्रतापराव गुजर होते परंतु बहलोल खाना समवेत लढताना 24 फेब्रुवारी 1674 ला त्यांना वीरमरण आले.

प्रतापरावांच्या जाण्याने सरसेनापती पदाची जवाबदारी अश्याच निधड्या छातीच्या वीराला देण्याची महाराजांची इच्छा होती.

पराक्रमी हंबीरराव – Hambirrao Mohite

प्रतापराव ज्या युद्धात मरण पावले त्याच युद्धात हंबीररावांनी 6 तासात तब्बल 600 शत्रूंना कंठस्नान घातले असे म्हंटल्या जाते.

युद्धात जर एखाद्या मावळ्याने 100 शत्रूंना मारले तर त्याच्या तलवारीवर एक चांदणीचा शिक्का कोरण्यात येई, हंबीररावांच्या तलवारीवर 6 चांदण्या कोरण्यात आल्या होत्या. असा पराक्रम कुणीही केल्याचे आजतागायत ऐकिवात नाही. आणि म्हणूनच हंबीररावांची सरसेनापती पदावर नेमणूक करण्यात आली.

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाईंचे भाऊ होते शिवाय राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या हंबीररावांची कन्या.

बहलोल खानाशी लढताना प्रतापराव धारातीर्थी पडल्याची खबर हंबीररावांच्या कानावर पडताच त्यांनी आदिलशाही सैन्यावर कडाडून हल्ला केला व शत्रूला विजापूर पर्यंत पिटाळून लावले.

छत्रपतींशी इमान राखणारे हंबीरराव – Hambirrao who maintains trust with Chhatrapati

हंबीररावांना छत्रपती शिवरायांचा शब्द प्रमाण होता ते कायम महाराजांशी प्रामाणिक राहिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडल्यानंतर महाराजांनी हंबीररावांना मोगल सुभेदार दिलेरखान आणि बहादूर खानाच्या छावण्यांवर हल्ला करण्याचे आदेश दिले.

हंबीररावांनी हि मोहीम तर फत्ते केलीच शिवाय मोगलांच्या खानदेश, गुजरात, बागलाण, वऱ्हाड, बऱ्हाणपूर, माहूड, वरकड पर्यंतच्या प्रदेशांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला.

पुढे सरसेनापती हंबीरराव यांनी कर्नाटकात कोप्पल मधील आदिलशाही पठाणी सरदार हुसैनखान मियाणाचा येलबुर्गा या ठिकाणी पाडाव केला व त्याच्या अन्यायाने पिडीत रयतेची त्याच्या जुलुमातून मुक्तता केली.

हंबीररावांनी महाराजांसंमवेत अनेक मोहिमा फत्ते करून मराठा साम्राज्याची पाळ-मूळ घट्ट करण्यात मोलाचे योगदान दिले.

हंबीरराव अखेरपर्यंत संभाजी महाराजांशी राहीले एकनिष्ठ – Hambirrao Mohite remained loyal to Sambhaji Maharaj till the end

पुढे शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर सोयराबाईंनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी संभाजी महाराजांच्या कानावर पडताच संभाजी महाराजांनी समस्त किल्लेदारांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या समक्ष हजर होण्याचे आदेश दिलेत.

हा आदेश हंबीररावांना मिळताच त्यांनी आपली बहिण सोयराबाईंनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

संभाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर हंबीररावांनी त्यांच्या आज्ञेत विविध आघाड्यांवर आपला पराक्रम गाजविला.

यामध्ये बऱ्हाणपूर काबीज करून त्यात मिळालेली प्रचंड लुट महत्वाची आहे. या विजयामुळे मोगलांचे नाक चांगलेच कापले गेले.

गाजीउद्दिन खान बहादूर यांच्यावर हंबीररावांनी केलेली स्वारी देखील इतिहासात महत्वाची मानली गेली आहे.

गाजीउद्दिन ने रामसेज किल्ल्याला वेढा दिला होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर जोरदार आक्रमण करून पराक्रम गाजविला.

या लढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.

यानंतर पुढे संभाजी महाराजांच्या आज्ञेनुसार हंबीररावांनी पन्हाळा परिसरातून शहजादा आजमला आणि भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान ला पळवून लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

कल्याणनजीक बहादुरखानाचा आणि रहुल्ला खानाला पराजित केले.

रायगडाजवळ 1688 साली गाजीउद्दिन खानासमवेत हंबीररावांनी दोन हात केले परंतु या युद्धात मराठा सैन्याचे बरेच नुकसान झाले. पुढच्या काळात संभाजी महाराजांसोबत हंबीररावांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या.

मराठा स्वराज्याने पराक्रमी हंबीररावांना गमावले – Maratha Swaraj lost the mighty Hambirrao Mohite

हंबीररावांचे मोगलांसमवेत वाईजवळील युद्ध हे अखेरचे युद्ध ठरले.

या लढाईत मोगलांचा सरदार सरझाखानाचा पराभव झाला परंतु या युद्धात तोफेचा गोळा लागल्याने हंबीरराव धारातीर्थी पडले…

मराठ्यांनी या युद्धात विजय मिळवला खरा पण स्वराज्यातील अनमोल असा हिरा मात्र या लढाईत गमावला.

संभाजी महाराजांनी जितक्या लढाया लढल्यात त्या प्रत्येक युद्धात हंबीररावांचा उल्लेख आपल्याला आढळतो.

सेनापती पदाला शोभेल अशी कामगिरी त्यांनी प्रत्येक युद्धात केलेली आपल्याला दिसून येते…

अखेरच्या श्वासापर्यंत लढून शिवाजी महाराजांनी त्यांची सरसेनापतीपदी केलेली निवड त्यांनी सार्थ करून दाखविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here