बंधुभावाचा संदेश देणारा सण होळी                                 

Holi Information in Marathi

संपुर्ण भारतात साजरा होणारा… बंधुभावाचा संदेश देणारा सण होळी… होळी आणि धुळवड एकमेकांच्या हातात हात घेउन येणारे हे सण सर्व धर्म समभावाचा देखील संदेश देणारे आहेत.. राग लोभ विसरून पुन्हा नव्याने एकत्र येत गुण्यागोविंदाने नांदण्याच्या या सणाला अगदी पुरातन असा वारसा लाभलेला आहे.

भगवान श्रीकृष्ण आपल्या राधे समवेत आणि गोप गोपिकांसमवेत वृंदावनात रंगपंचमी साजरी करत असल्याचे दाखले आपल्या हिंदु संस्कृतीतुन आपल्याला आजही मिळतात.

गोकुळात भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगडयांसमवेत होळी खेळत असत. त्यांच्या त्या वेळेसच्या कृतीतुन आपल्याला सर्व धर्म समभावाची आणि जाती भेद विसरून सगळेजण एक असल्याची शिकवण मिळते. त्यांच्या वृंदावनात, मथुरेत, आज देखील पारंपारीक होळी साजरी होत असते. ही रंगपंचमी बरेच दिवस आधिपासुन सुरू होउन पुढे बरेच दिवस सुरू असते.

हा उत्सव पाहण्याकरता देशविदेशातुन बरीच मंडळी येतात व हा उत्सव पाहुन भावविभोर होउन जातात. एकत्र नांदण्याचा संदेश देणारा हा सण वर्षातील सर्व सणांमधे जास्त लोकप्रीय असण्याचे हेच एकमेव कारण आहे.

बंधुभावाचा संदेश देणारा सण होळी – Holi Information in Marathi

Holi Festival

होळी पौर्णिमा…होलिकादहन… शिमगा… दोलायात्रा… हुताशनी महोत्सव… कामदहन… अश्या अनेक नावांनी अनेक प्रांतात हा सण साजरा होत असतो.

होळी पुर्वी वातावरणात थंडी असते ती थंडी ही होळी पेटवल्याने कमी होते आणि सामान्य माणसाला यामुळे उष्णतेचा लाभ होतो.

आपले बरेचसे सण हे शेतकरी बांधवांशी निगडीत आहेत. या दिवसांमधे गहु घरी आलेला असतो आणि या दिवसांमधे आणि पुढच्या काही महिन्यांपर्यंत शेतकऱ्याना शेतीसंबंधीत काही कामं नसल्याने त्या दिवसांमधे होळी हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो.

मिळालेल्या धान्याबद्दल देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातुन देखील या सणाकडे पाहिले जाते.

होळीच्या पुजेची पध्दत – Holi Puja Vidhi

या पेटत्या होळीला गव्हाच्या ओंब्या अर्पण करण्याची देखील प्रथा आहे. घरी आलेले नविन पिक देवाला अर्पण करण्याची भावना यातुन दिसते. पेटत्या होळीत मंत्र म्हणुन समिधा अर्पण केल्या जातात. होळीला नारळ देखील अर्पण केल्या जातो.

होळी तयार करण्याआधी मध्यभागी एरंड किंवा माड, पोफळी, ऊस उभा करतात त्याच्या भवती गवऱ्या आणि लाकडे रचतात. अग्नि प्रज्वलीत करणाऱ्याने स्नान करून शुचिर्भुत होउन होलिकायै नमः हा मंत्र म्हणत होळी पेटवावी.

तिच्या भवती प्रदक्षिणा मारत पाणी फिरवावे, शंखनाद करावा, होळी शांत झाल्यावर दुध दही शिंपडुन अग्निला शांत करावे. उपस्थितांना प्रसादाचे वितरण करावे.

या दिवशी पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य करून होळीला अर्पण केल्या जातो. होळीला बोंबा ठोकण्याची देखील प्रथा बरेच ठिकाणी पहायला मिळते.

या अग्निची शांत झालेली राख अंगाला लावुन स्नान करण्याची देखील प्रथा काही ठिकाणी पहावयास मिळते.

नकारात्मकता, वाईट गोष्टी, अमंगल या पेटत्या होळीत जळुन खाक होउन जाओ अशी या होळी पेटवण्यामागे धारणा असल्याचे लक्षात येते.

पुराणकथा – Holi Story in Marathi

भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णुंचा निस्सीम भक्त होता नारायण नारायण हा जप नित्य सदोदित त्याच्या मुखातुन सुरू असायचा त्याचे पिता हिरण्यकश्यपु यांना भगवान विष्णुचे नाव कदापीही सहन होत नसे.

त्यांनी प्रल्हादाला सर्व तऱ्हेने समजवुन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु भक्त प्रल्हादाने भगवान विष्णुचे नाव घेणे थांबविले नाही त्यामुळे क्रोधित होउन हिरण्यकश्यपुने आपली बहिण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेउन जिवंत अग्नित बसण्याचे फर्मावले.

होलिका हिला वरदान मिळाले होते की ती अग्नित भस्म होणार नाही म्हणुन ती पेटत्या अग्नित प्रल्हादाला मांडीवर घेउन बसली परंतु झाले असे की होलिका जळु लागली परंतु भक्त प्रल्हादाला साधे खरचटले देखील नाही.

कारण ती हे विसरली की तिला हे वरदान मिळाले त्यावेळी हे सुध्दा सांगण्यात आले होते की जर तिने या वरदानाचा गैर वापर केला तर ती स्वतः भस्म होउन जाईल. भक्त प्रल्हादाचे रक्षण करणाऱ्या या अग्निचे स्मरण म्हणुन देखील होळी पेटवली जाते.

आदिवासी बांधवांची होळी:

आदिवासी समाजाकरता होळी हा सण दिवाळी या सणापेक्षा कमी नसतो. आदिवासी बांधवांची होळी सणाची तयारी फार आधीपासुन सुरू होते. चार पाच पाडे मिळुन एक होळी पेटवली जाते.

होळीचे सपत्निक पुजन करून मोहाच्या फुलापासुन काढलेल्या दारूचे सेवन करण्याची प्रथा या आदिवासी बांधवांमधे आढळते.

या कच्च्या दारूचे सेवन केल्यानंतर होळीभवती आदिवासी बांधव नाचगाणे करतात.

काही काही मंडळी तर विविध सोंग घेउन गावभर फिरतात.

काही लोक बोललेला नवस फेडण्याकरता देखील सोंग घेउन होळीला नैवेद्य दाखवुन नवस पुर्ण करतात.

हे सोंग हे आदिवासी बांधव सलग पाच वर्ष धारण करतात कारण होळीला बोललेला नवस पुर्ण करण्याकरता सलग पाच वर्ष सोंग घ्यावे लागते.

ते मधेच अर्धवट सोडले तर त्या देवाचा कोप होतो अशी या बांधवांची समजुत आहे.

रंगपंचमी विषयीची माहिती मराठींमध्ये -Rang Panchami, Holi Chi Mahiti

Rangpanchami Information in Marathi

धुळवड / रंगपंचमी माहिती – Dhulvad / Rangpanchami Information

होळीचा दुसरा दिवस धुळवडीने सर्वत्र साजरा करण्याची परंपरा आहे.

कुठे एक दिवस तर कुठे पाच पाच दिवस रंगपंचमी साजरी होत असते.

काही ठिकाणी टोळया निघतात आणि दिसेल त्याला विविध रंगांनी रंगवतात.

काही भागात चौकाचौकात मोठमोठी पाण्याची टाकी ठेवली जातात त्यात रंग टाकुन मोठया प्रमाणात रंगाचे पाणी तयार केलेले असते.

जो दिसेल त्याला त्या पाण्याच्या टाक्यात टाकुन रंगविल्या जाते.

उत्तर भारतात तर रंगोत्सवाची वेगळीच धुम पाहाण्यात येते.

ही होळी पाहाण्याकरता भारतातल्या लोकांप्रमाणेच विदेशी पर्यटक देखील या उत्सवाचा आनंद घेण्याकरता ब्रज, वृंदावन, गोकुळात होळी पाहाण्याकरता येतात.

येथे धुळवड बरेच दिवसांपर्यंत साजरी होते.

ब्रजधाम येथे पुरूष महिलांना रंग लावतात आणि महिला त्यांना काठीने मारतात याला लठमार होली असे म्हणतात येथे बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळण्याची प्रथा सुध्दा पाहीली जाते.

सगळेजणं एकत्र येउन रंगपंचमी या सणाचा आनंद घेतात. निरनिराळया पदार्थांची रेलचेल देखील या दरम्यान बघायला मिळते.

बऱ्याच ठिकाणी भांग पिऊन होळी साजरी करतात. ही भांग पारंपारिक पध्दतीने बनविली जाते आणि स्त्रिया पुरूष सर्वचजणं याचे सेवन करतात.

भांग पिउन मदमस्त होत नाचगाणे करतात आणि एकमेकांना माफ करत सर्व रागरूसवे या सणामधे संपुवुन टाकतात.

टोळयाच्या टोळया एकमेकांच्या घरी जातात आणि सर्वांना रंगवतात व म्हणतात ‘बुरा ना मानो होली है’.

होळी खेळतांना घ्यावयाची काळजी – Holi Tips

  • होळी खेळतांना नैसर्गिक रंगांचा वापर करावा.
  • शक्यतो होळी कोरडया रंगांनी खेळावी त्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येईल
  • वार्निस आणि यासारखी इतर रंग वापरू नयेत त्यामुळे त्वचेची हानी होण्याची शक्यता असते.
  • भांग आणि इतर मादक पदार्थांचे सेवन या दिवशी टाळावे. मागणी जास्त असल्याने या सुमारास त्यात भेसळ असण्याची शक्यता अधिक असते.
  • एखाद्याला रंग खेळणे आवडत नसेल तर त्यास जबरदस्ती करू नये.
  • होळी हा आनंदाचा आणि भेदभाव, वादविवाद विसरून नव्याने येणाऱ्या काळाला सामोरं जाण्याचा सण आहे तो गुण्या गोविंदानेच खेळावयास हवा.
  • पुर्वी होळी खेळतांना पारंपारिक रंगांचा वापर होत असे.
  • उदा. गुलमोहराची पाने, पळसाची फुलं, फुलांच्या पाकळया, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ इत्यादीपासुन तयार होणारे रंग त्वचेला लाभदायीच ठरायचे.
  • हर्बल रंग बाजारात उपलब्ध असतात. त्याचा वापर करावा.

तर होळी खेळताना आपली काळजी घ्या आणि आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here