श्री कानिफनाथांची आरती

Kanifnath Aarti

नाथ संप्रदायातील नवनाथ महाराज यांच्या नऊ अवतारांपैकी एक काफिनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नसले तरी त्यांनी नाथ संप्रदायाला शिखर स्थानी पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम केलं आहे.

कानिफनाथ महाराज यांच्या जन्माबाबत नाथ संप्रदायात अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यानुसार, श्री नऊनारायणांनी (नवनाथ) भगवान श्रीकृष्ण यांच्या आदेशानुसार नाथांच्या वेगवेगळ्या नऊ रुपात अवतार धारण केले. त्याचप्रमाणे, श्री प्रबुद्ध नारायण यांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानातून प्रकट झाल्याने त्यांचे नाव कानिफनाथ असे पडले.

आज आपण येथे कानिफनाथांची आरती चे लिखाण करणार आहोत, चला तर पाहूया कानिफनाथांची आरती –

श्री कानिफनाथांची आरती – Kanifnath Aarti

Kanifnath Aarti
Kanifnath Aarti

जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।
पतिपावना ओवळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

ऋषभपुत्र श्रीप्रभुध्द नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजस्वती ।।

नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रितवरुनी केली तपपूर्ती ।।

नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवुनि मिळवी वरप्राप्ती ।।

गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसुनि रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।

सुवर्णामुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।

सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथ तुमची ।।

गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळिती होऊनी हर्षभरी ।।

चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बीद्रावळी गजरी ।।

सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।

नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामधे मच्छिंद्रनाथे परिक्षिले समयी ।।

प्रेमे गोपीचंद रक्षिला असुनी अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।

जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तरली ।।

अवनी भ्रमुनि निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापुनि स्वानंदाने मढी पावन केली ।।

समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।

गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंदी झाला लीन चरणी ।।

श्री कानिफनाथांबद्दल थोडक्यात – Kanifnath Story

कानिफनाथ हे नाथ संप्रदायातील नऊ नारायणांपैकी एक असून त्यांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली तसचं, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. कानिफनाथ महाराज यांनी बद्रीनाथ या ठिकाणी भागीरथी नदीच्या किनारी राहून सुमारे १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली. तसचं, घनदाट जंगलात राहून योग साधना केली.

यानंतर त्यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून दिन दलित लोकांच्या मनात भक्तिमार्गावर चालण्याची भावना जागृत केली. तसचं, दलितांची पिडा नष्ट करण्यासाठी साबरी भाषेत रचना केली. साबरी भाषेसंबधी असे सांगण्यात येते की, या भाषेत गायन केल्याने रोग्यांचे रोग बरे होत असत.

आज सुद्धा भाविक मोठ्या संख्येने आपली आजारापासून सुटका व्हावी याकरिता कानिफनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हायला जात असतात. नाथ संप्रदायाची पताका देशाच्या कान्याकोपऱ्यात फडकवीत कानिफनाथ महाराज हिमालयाकडून दक्षिणेकडे आले.

दक्षिणेकडील महाराष्ट्र राज्यांत आल्या नंतर त्यांनी नगर जिल्ह्यांतील मढी या गावी इ.स. १७१० साली फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली.  कानिफनाथ महाराज यांनी ज्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली होती, ते समाधी स्थळ भव्य किल्ल्याप्रमाणे एका उंच टेकडीवर आहे.

कानिफनाथ महाराज यांचे मंदिर स्थापन करण्याबाबत इतिहास काळातील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, राणी येसूबाई आणि बाळराजे शाहूमहाराज पहिले जेंव्हा मुघलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केला होता की, जर माझ्या शाहूमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी, कानिफनाथ गडाचा सभा मंडप, नगारखाना बांधीन आणि देवाला पितळीचा घोडा अर्पण करीन.

भक्तांची विनवणी कानी पडताच कानिफनाथ महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला धावून आले आणि पाच दिवसाच्या आत राणी येसूबाई आणि बाळ शाहूमहाराज यांची मुघलांच्या तावडीतून सुटका झाली. राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केल्याप्रमाणे कानिफनाथ गडावर भक्कम स्वरूपी सभामंडप उभारला.

तसचं, नगारखाना, प्रवेशद्वार आणि पाण्यासाठी गौतमी बारव बांधली. अश्या प्रकारे येसूबाईंनी श्री कानिफनाथ महाराज यांना नवस केल्याप्रमाणे भव्य बांधकाम केले व पितळीचा घोडा भेट दिला.

या मंदिराच्या निर्माण कार्यात यादव, कैकाडी, बेलदार, वैद्य, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, कुंभार आणि वडारी यांच्यासोबत इतर अन्य जाती वर्गाच्या अनेक लोकांनी सहकार्य केले. यामुळे या तीर्थस्थळाला दलितांची पंढरी म्हणून ओळखलं जाते. नगर जिल्ह्यांतील अनेक भाविक कानिफनाथ महाराजांना आपले कुलदेवता मानतात.

कानिफनाथ महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या गर्भगिरी पर्वतावर कानिफनाथ महाराज यांच्या समाधी स्थळासोबतच गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ आणि जालिंद्रनाथ महाराजांचे समाधी स्थळे सुद्धा बांधली आहेत.

मित्रांनो वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यामतून मिळवली असून कानिफनाथ महाराज यांच्याबाबत आपणास सर्वसामान्य माहिती माहित व्हावी तसचं, त्यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या कानिफनाथ आरतीचे महत्व आपणास समजावे याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top