पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेले गोरोबा काकां उर्फ संत गोरा कुंभार यांचे चरित्र

Sant Gora Kumbhar in Marathi

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती”

असं संतां साठी म्हंटलं गेलं ते सत्य असल्याची प्रचीती ठायी-ठायी येते. संत महात्मे हे चंदनासारखे भासतात, चंदन जसं स्वतः झिजून इतरांना सुगंध देतं अगदी त्याच प्रमाणे संत स्वतः झिजून जगाच्या कल्याणाचा मार्ग तयार करतात. संसार आणि परमार्थ वेगळा न मानता प्रपंच परमार्थमय करणारे संत गोरा कुंभार देखील एक श्रेष्ठ संत या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले.

संत गोरोबा काका म्हणून सर्व सामान्यांना ते अधिक जवळचे वाटतात, एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचं आयुष्य व्यतीत झालं. विठ्ठला प्रती आपला भक्तीभाव जपत गोरोबा काकांनी आपला संसार परमार्थमय केला.

करणी करे तो नरका नारायण होय या ओळींप्रमाणे संत गोरा कुंभार यांनी विठ्ठल भगवंतांची महिमा सर्वांना पटवून दिली. जणू “विठ्ठल भक्तच विठ्ठल” होऊन गेले. प्रपंच आणि परमार्थ त्यांनी वेगळा मानला नाही.

संत गोरा कुंभार यांचा जीवनपरिचय – Sant Gora Kumbhar Information in Marathi

Sant Gora Kumbhar Information in Marathi
Sant Gora Kumbhar Information in Marathi

संत गोरा कुंभार यांची संक्षिप्त माहिती – Sant Gora Kumbhar Biography in Marathi

नाव संत गोरा कुंभार
गाव तेरढोकी. पंढरपूर जवळ
जन्म शके 1189 ई.स. 1267
समाधी शके 1239 ई.स. 20 एप्रिल 1317
समाधी मंदिर तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद
पत्नी दोन पत्नी संती आणि रामी
समाज कुंभार

संत गोरा कुंभार यांचे जीवन – Sant Gora Kumbhar Life Story in Marathi

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील ते संत असल्याचे मानले जाते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात.

“तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम

देह प्रपंचाचा दास सुखे करी काम”

सगळ्या संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

आपली रोजची कर्म जवाबदारीने करणारा कुठेही असो, घरीदारी, डोंगर-दऱ्यात, अरण्यात पण त्याच्या मनात मानवाच्या कल्याणाचा ध्यास असावा. स्वार्थी आणि लोभी मनुष्य वारकरी संत असल्याचे त्यांना मान्य नाही.

संत गोरा कुंभार यांच्या विषयीच्या आख्यायिका – Sant Gora Kumbhar Story

संत गोरा कुंभार हे आपलं नित्यकर्म करत असतांना देखील विठ्ठल नामात तल्लीन असत. कुंभारकाम करत असतांना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे. एकदा त्यांची पत्नी पाणी आणायला गेली असतांना आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेऊन गेली. त्यावेळी अंगणात गोरा कुंभार माती तुडवीत होते नामसंकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि गोरा कुंभार यांच्या पायाखाली तुडविले गेले याची जाणीव देखील त्यांना राहीली नाही.

विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना तुडवितांना मूल रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले पण तो सापडला नाही. तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेले, ती माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली आणि तिने हंबरडा फोडला..आकांत केला…तिच्यावर आणि गोरा कुंभार यांच्यावर आभाळ कोसळले. प्रायश्चित म्हणून गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले.

हात तुटल्याने त्यांचा व्यवसाय देखील बसला. असं म्हणतात की, स्वतः विठ्ठल -रुखमाई त्यांच्या घरी येऊन राहू लागले आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा बहरला पुढे आषाढी वारीच्या निमित्ताने संत मंडळी पंढरपुरास निघाली, वाटेत संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी तेरढोकी येथून संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला देखील सोबत घेतलं. गरुड पारावर संत नामदेव कीर्तनाला उभे राहीले. संत ज्ञानेश्वरांसह सकल संत मंडळी कीर्तन ऐकावयास बसली. संत गोरा कुंभार आपल्या पत्नीसह कीर्तनात बसले होते.

त्या दरम्यान वारकरी पांडुरंगाचा नामगजर करीत हात वर करून टाळ्या वाजवू लागले. गोरा कुंभार यांनी देखील अभावितपणे आपले थिटे हात उचलले, त्याक्षणी त्या थोट्या हातांना हात फुटले. सर्वांना अतिशय आनंद झाला संत मंडळीनी विठ्ठलाचा जयजयकार केला. गोरा कुंभार यांची पत्नी कीर्तनात बसली होती.

पतीचे हात पाहून तिला समाधानाचे भरते आले तिने चालू असलेल्या कीर्तनात पांडुरंगाची करून भाकली…प्रार्थना केली पांडुरंगा माझे मूल पतीच्या पायी तुडविले गेले त्यामुळे आम्ही फार दुःखी-कष्टी आहोत तुला माझी करुणा येऊ दे, माझे मूल मला परत देती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली.

आणि काय आश्चर्य! त्या कीर्तनात चिखलात तुडविले गेलेले तिचे बाळ रांगत-रांगत तिच्याकडे येत असल्याचे तिने पाहीले. आनंदाच्या भरात तिनं बाळाला कडेवर उचललं. सगळ्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जयजयकार केला, आनंदाने सभामंडप दुमदुमून गेला.

संत गोरा कुंभार यांची समाधी – Sant Gora Kumbhar Death 

शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला (20 एप्रिल 1317) संत गोरा कुंभार यांनी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर आणि मुल तुडविलेली जागा आज देखील भाविक दाखवितात.

संत गोरा कुंभार यांचे चित्रपट – Sant Gora Kumbhar Movie 

  • संत गोरा कुंभार नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला असून त्याचे दिग्दर्शक राजा ठाकूर होते.
  • संत गोरा कुंभार नावाचे नाटक देखील मराठी रंगभूमीवर येऊन गेले आहे. या नाटकात प्रसाद सावकार यांनी गोरोबा काकांची भूमिका केली होती. लेखन अशोकजी परांजपे यांचे होते.
  • 1978 साली भगत गोरा कुंभार नावाचा चित्रपट हिंदी हिंदी भाषेत तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश रावल यांचे होते.
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here