शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज

Gajanan Maharaj Shegaon

गण गण गणात बोते”!  मनाला मुग्ध करणारा असा हा मंत्र देणारे ब्रम्हांडनायक त्रैलोक्याधीपती श्री गजानन महाराज यांचे वर्णन करताना संत दासगणू महाराज म्हणतात!

हा शेगांव खाणीचा।

हिरा गजानन होय साचा।

प्रभाव त्या अवलियाचा।

अल्पमतीनें वर्णितो मी।

याप्रकारे संत दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात प्रथम अध्यायात गजानन महाराजांचे वर्णन केले आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या गजानन महाराजांविषयी या लेखात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

सोबतच शेगांव संस्थानविषयी माहिती सुद्धा या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत.

शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज – Gajanan Maharaj Information in Marathi

Gajanan Maharaj Information in Marathi

तर चला सुरुवात करूया!

माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ हा तो दिवस होता, जेव्हा गजानन महाराज शेगांव येथे देविदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळी वरचे अन्न शोधून खात होते.

अंगावर एक मळके कापड, पाणी प्यायचे पात्र म्हणून एक भोपळा, आणि हातात एक चिलम, अश्या अवस्थेत गजानन महाराज मठाबाहेर बसलेले असता, बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे पातुरकरांच्या मठाजवळून जात असताना गजानन महाराजांचे दिगंबर अवस्थेतील रूप त्यांच्या दृष्टीस पडले.

त्यानंतर त्यांना कळेनासे झाले कि कोण हा अज्ञात व्यक्ती आहे, जो उष्ट्या पत्रावळी वरील शिते वेचून खात आहे.

त्यांच्या मनी अशी जाणीव झाली कि हा जर उपाशी व्यक्ती असता तर देविदास पातुरकरांकडे याने अन्नाची मागणी केली असती आणि पातुरकर एवढे सज्जन व्यक्ती तर आहेतच कि त्यांनी याची मदत सुद्धा केली असती.

परंतु हा कोणी उपाशी व्यक्ती तर दिसत नाही, त्यांच्या मनात त्या व्यक्तीला जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली,

त्यासाठी बंकटलाल पुढे होऊन विचारू लागले, आपणास भूक लागली असेल तर आम्ही आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था करू शकतो.

त्यावर कोणतेही उत्तर न देता त्या अवलीयांनी फक्त वरती पाहिले. आणि पुन्हा पत्रवाळीवर शिते शोधू लागले.

त्यांनतर बंकटलालने त्या अवलियासाठी देविदास पातुरकरांच्या घरून जेवणाची व्यवस्था केली.

पण सर्व जेवणाचे कालवण करून कोणत्याही प्रकारची चव न घेता त्या अवलियांनी जेवणाचा स्वीकार केला, तोच दामोदरपंत पाण्याचा तांब्या भरून येईपर्यंत त्या अवलीयांनी जवळच असलेल्या गुरांच्या पिण्याचे पाणी पित आपल्या जेवणाची समाप्ती केली.

Gajanan Maharaj Shegaon Mahiti

तसेच दामोदरपंत यांनी भरून आणलेल्या तांब्याला पुढे करत दामोदरपंत म्हणाले कि मी आपल्यासाठी निर्मळ, गार, पाणी आणले आहे, त्यावर महाराजांनी त्यांना उत्तर देतांना काढलेले हे शब्द,

हें अवघें चराचर।

ब्रम्हे व्याप्त साचार।

तेथें गढुळ, निर्मळ वसित नीर।

हे न भेद राहिले।

याचा अर्थ असा कि पूर्ण चराचरामध्ये तो भगवंत वास करतो, मग गढूळ आणि निर्मळ पाण्यामध्ये काय फरक करावा.

असे सांगत तेथून गजानन महाराज वाऱ्याच्या वेगाने चालत निघून गेले, त्यांनतर बंकटा ला घरी गेल्यानंतर हुरहूर वाटू लागले, पुन्हा त्या समर्थाची भेट व्हावी हि इच्छा मनी निर्माण झाली.

त्यांनी पूर्ण शेगांव शोधले तरीही महाराजांचा शोध काही लागला नाही.

त्याच दिवशी शेगांवला वर्‍हाडांत ख्याती असलेले गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते, शंकराच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठरलेला होता.

सर्व गावकरी कीर्तन ऐकायला शंकराच्या मंदिरात एकत्रित झाले होते,

बंकटलालही कीर्तन ऐकायला मंदिरात पोहचत असताना, पितांबर नावाचा शिंपी त्याला मध्ये भेटला, बंकटलालाने घडलेली सर्व कथा त्यास सांगितली, आणि कीर्तनास निघाले तोच मंदिराच्या पाठीमागे त्यांना महाराजांचे दर्शन झाले,

ज्याप्रमाणे मोराला आकशातील ढगांना पाहून आनंद होतो, त्याचप्रमाणे बंकटाला महाराजांना पाहून आनंद झाला.

त्याने थोडे दूर उभे राहूनच विचारले, आपणास खायला काही आणू का?

त्यावर महाराज उद्गारले, तुला आम्हाला जेवूच घालायचे आहे तर माळनीच्या सदनातून झुणका भाकर घेऊन ये!

थोडाही उशीर न करता बंकटलालाने महाराजांच्या हातावर झुणका भाकर आणून ठेवली, भाकरी खाताना महाराजांनी पितांबराला सांगितले कि जा शेजारील ओढ्यातून पाणी भरून आण.

पितांबर बोलला कि, मी आपल्याला चांगले पाणी आणून देतो त्यावर महाराज बोलले, कि नको आम्हाला तू ओढ्यातील पाणीच भरून आण तेही तांब्या बुडवून.

महाराजांनी सांगितल्या प्रमाणे पितांबर ओढ्याजवळ गेला, पण तिथे पायाचे तळवे भिजतील एवढेच पाणी होते, तरीही पितांबराने हातातील तांब्या ओढ्यामध्ये बुडवत पाणी काढण्याचे प्रयत्न सुरु केले.

पाहता पाहता तो तांब्या आपोआप खाली जात होता आणि त्यामध्ये पाणी भरत होते.

Gajanan Maharaj History in Marathi

पितांबराने तांब्याला वर काढले तर पाहतो काय त्यामध्ये नितळ जल आले होते,  ते पाहून तो आश्यर्यचकित झाला.

त्याने थोडाही विलंब न करता महाराजांजवळ पाण्याचा तांब्या आणून ठेवला.

त्यानंतर महाराजांनी बंकटलालाला असे म्हटले, फक्त भाकरीवरच आमची सेवा करतोस का काढ तुझ्या  खिशातील सुपारी!

असे ऐकताच बंकाटाने आपल्या खिशातील सुपारी तसेच काही पैसे महाराजांच्या हातावर ठेवले, जे पाहून महाराजांनी उद्गार काढले, मी काय व्यापारी आहे का? हे पैसे तुमच्या व्यवहाराच्या कामात येत असतील, माझ्या नाही.

माझ्यासाठी भक्ताचा भाव आणि भक्ती हि सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.

तुझ्याजवळ तो भाव होता म्हणून मी पुन्हा तुला दिसलो, आता जा तुम्ही कीर्तनाला मी बसतो इथे, असे बोलून महाराज तिथे निंबाच्या झाडाजवळ बसले,

कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर गोविंदबुवांनी एकादश स्कंधाचा श्लोक म्हणत असताना त्या श्लोकाला महाराजांनी गोविंदबुवा पेक्षा लवकर बोलून समाप्त केला.

हे ऐकून गोविंदबुवा आश्यर्यचकीत होऊन गावकऱ्यांना म्हणतात, हे कोणीतरी महापुरुष दिसतात, घेऊन या त्यांना आपल्या कीर्तनाला गावकरी तसेच बंकटलाल महाराजांना घेऊन येण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले.

पण महाराज तेथून हलायला तयार नव्हते, शेवटी गोविंदबुवा स्वतः महाराजांजवळ जाऊन त्यांना म्हणतात आपण साक्षात शंकराचे रूप, आपण बाहेर न बसता मंदिराच्या आतमध्ये चलावे,

त्यावर महाराज म्हणतात, गोविंदा तुझ्या शब्दामध्ये एकवाक्यता ठेव. आताच तू कीर्तनामध्ये सांगत होता ईश्वराने हि पूर्ण धरती व्यापली आहे, प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे.

मग आता का म्हणतोस कि मंदिराच्या आत चला.

साधकाने जसे बोलावे तसेच वागावे.

तू जा आणि कीर्तन पूर्ण कर आम्ही ऐकतो येथूनच असे सांगत महाराजांनी गोविंदबुवांना कीर्तनाला पाठवले.

तेच परत येताच सर्व गावकऱ्यांना गर्जून गोविंदबुवा सांगू लागले, शेगांव हे या महात्माच्या पाऊलांनी पंढरपूर झाले.

या महात्म्याची सेवा करा, यांची आज्ञा पाळा, तुमचे कल्याण होईल.

दुसऱ्या दिवशी बंकटाने त्याच्या वडिलांना महाराजांविषयी सांगितले असता.

त्याने महाराजांना त्याच्या घरी आणण्याचे वडिलांना विचारले, वडिलांच्या परवानगीनंतर त्याने महाराजांना घरी घेऊन यायचा आग्रह धरला,

संध्याकाळची वेळ होती, चौथ्यादिवशी माणिकचौकात बंकटाला महाराजांची भेट झाली, तेथूनच  महाराजांना तो त्याच्या घरी घेऊन आला.

घरी येताच बंकटलालच्या वडिलांनी महाराजांचे दर्शन घेत, त्यांना त्यांच्या घरी भोजन करून तिथेच झोपण्याचा आग्रह केला.

तिथेच रात्र काढल्यानंतर दुसर्या दिवशी बंकटलालच्या घरी महाराजांना स्नान घालण्यात आले.

त्या स्नानाचा उल्लेख गणुदास महाराज विजय ग्रंथात या शब्दांत करतात.

घागरीं सुमारें शंभर।

उष्णोदकाच्या साचार।

पाणी घालती नारीनर।

मन मानेल ऐशा रीतीं॥

कुणी शिकेकाई लाविती।

कुणी साबण घेऊन हातीं।

समर्थांतें घासीती।

पदकमळ आवडीनें॥

About Gajanan Maharaj

अंघोळीनंतर महाराजांना हार वस्त्र घालण्यात आले, दर्शनासाठी गावकरी येत होते.

बंकटलालाचे घर जणू द्वारकाच झाले होते, दोन दिंड्या विठुरायाचा गजर करत तेथे आलेल्या होत्या,

त्या गजराच्या प्रवाहात महाराजांनी प्रथमता “गण गण गणात बोते”  हे उच्चार काढले.

नेहमी हा मंत्र उच्चारत असल्यामुळे त्यांना गजानन हे नाव पडले.

आणि मग ते गजानन महाराज म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखीचे झाले.

त्यानंतर गजानन महाराजांनी अगाध लीला घडून आणल्या.

कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर कधी प्रेमाने जनावराला शांत केले, तसेच कधी भक्तांचे दुःख दूर केले.

अश्या अनेक लीला गजानन महाराजांनी केल्या.

त्या लीलांचे वर्णन करायला गजानन विजय ग्रंथच कमी पडतो तर या छोट्याशा लेखात काय लिहिणे होईल.

तरीही लेखाची सांगता करताना मी लिहेल कि, जेव्हा गजानन महाराज यांना कळले कि त्यांच्या अवतार समाप्तीचा वेळ आला, तेव्हा ते हरी पाटील यांना सोबती घेऊन पंढरीला गेले. असं म्हटल्या जातं कि महाराजांचा बेत होता कि पंढरपूरलाच समाधी घ्यायची,

परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनुसार त्यांनी शेगांवलाच समाधी घेण्याचे ठरविले. पंढरपूर वरून शेगांवला आल्यानंतर समाधीचा दिवस ठरला तो होता भाद्रपद शुध्द पंचमी म्हणजेच ऋषीपंचमी, महाराजांनी समाधीच्या अगोदरच सांगितले होते,

मी गेलों ऐसें मानूं नका।

भक्तींत अंतर करुं नका।

कदा मजलागीं विसरुं नका।

मी आहे येथेंच ॥ 

समाधीपूर्वी महाराजांना स्नान घालून सुवासिके लाऊन महाराजांची आरती ओवाळण्यात आली, सूर्याच्या पहिल्या किरणासोबत महाराजांनी आपले प्राण देहातून अनंतात विलीन केले.

देहाचे कार्य करणे थांबले, हे पाहता सर्व भक्त गण एकदम शोकसागरात बुडाले.

त्यांना आकाश फाटल्यासारखे झाले होते.

सर्वत्र अश्रूंचा पूर वाहू लागला होता.

त्यावेळी कित्येक भक्तांना स्वतः गजानन महाराजांनी समाधीची वार्ता त्यांच्या स्वप्नात जाऊन कळविली.

तेव्हा गोविंद शास्त्रींनी असे सांगितले होते कि महाराजांचे सर्व भक्त जो पर्यंत दर्शन घेऊन जात नाही तो पर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकात धारण करून ठेवतील.

त्यानंतर महाराजांच्या समाधीचा सोहळा हा वर्णनीय झाला, लाखोंच्या संखेने महाराजांचे भक्त या मिरवणुकीचे भागीदार झाले.

Gajanan Maharaj in Marathi

रथामध्ये महाराजांचा देह ठेवून संपूर्ण शेगांव मधून मिरवणूक काढण्यात आली.

लोकांनी महाराजांच्या देहावर गुलाल,पुष्प, पैसे, उधळले.

सकाळी पहाटेच मिरवणूक मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक झाला.

त्यानंतर महाराजांचा देह शास्त्रात सांगितल्या नुसार उत्तरदिशेला देहाचे मुख करून समाधीच्या जागी ठेवला गेला,

शेवटची आरती ओवाळून सर्व भक्तांनी जयजयकार केला, आणि समाधीला शिळा लाऊन समाधीची जागा बंद केली.

आजही त्या समाधीच्या समोर लाखो भक्तगण नथमस्तक होतात, आणि आजही हजारो लोकांना महाराजांची अनुभूती येते,

गजानन महाराजांविषयी कितीही लिहिले तरीही कमीच त्यांच्या लीला अगाध आहेत, त्यांच्या लीलांचे गुणगान करणे माझ्यासारख्या पामराला शक्यच नाही.

म्हणून त्यांचा जयजयकार करताना मी एवढेच म्हणेल,

अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्द्गुरू श्री गजानन महाराज की जय”!

शेगांव संस्थानाविषयी थोडक्यात – Gajanan Maharaj Sansthan

आज महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत संस्थानांपैकी शेगांव हे एक नावाजलेले संस्थान आहे, संपूर्ण महाराष्ट्रात या  संस्थान सारखी शिस्त आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. आजही शेगांव शहरावर श्री गजानन महाराज यांची कृपा जशीच्या तशीच आहे.

भक्तांना कमी दरात राहण्याची, जेवणाची व्यवस्था हि मंदिरामार्फात केल्या जाते.

आपण जर शेगांव ला प्रथमता भेट देत असाल तर मंदिरामध्ये चौकशी कक्षामध्ये आपल्याला सर्व बाबींविषयी माहिती मिळून जाईल.

शेगांव येथील विश्वस्थ मंडळ हे स्तुती करण्यायोग्य आहे.

त्यांचे व्यवस्थापन हे बाकी संस्थानांनी शिकण्याजोगे आहे, कोणतीही परिस्थिती असो हे संस्थान स्वच्छतेला प्राथमिक प्राधान्य देते.

तसेच तेथील कर्मच्यार्यांची शिस्तही स्तुतीयोग्यचं आहे.

त्यामुळेच त्या संस्थानाला आणखी चांगली शोभा लाभते.

आपण जर अजूनही ह्या अलौकिक ठिकाणाला भेट दिली नसेल तर एक वेळ अवश्य भेट द्या.

आपल्याला रम्यमय वातावरणात आल्या सारखी अनुभूती येऊन जाईल.

आजच्या लेखात आपण श्री गजानन महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली तर मित्रहो आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल, आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत या लेखाला शेयर करायला विसरू नका,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top