लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी “मराठी राजभाषा दिनाच्या” शुभेच्छा

Marathi Rajbhasha Din

माझ्या मराठीची कास . . . तिला नाविण्याची आस . . . तिच्या अस्तित्वाचा भास . . . काय वर्णावा . . .

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवि कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस साजरा होत असतो त्या निमीत्तानं थोडसं . . . .

मंडळी त्या ओळी तुमच्या कानांनी ऐकल्या असतीलच . . . आणि ऐकल्यानंतर कान तृप्त देखील झाले असतील . . त्या ओळी आहेत . . . .

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी . . . .जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी . . .
बोलतो मराठी ऐकतो मराठी वाचतो मराठी सांगतो मराठी . . . . . .
आमुच्या नसांनसांत गुंजते मराठी . . . . . धर्म पंथ जात एक जाणतो मराठी . . . . . एवढ्या जगात माय मानतो मराठी . . . . .

Marathi Rajbhasha Din
Marathi Rajbhasha Din

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी “मराठी राजभाषा दिनाच्या” शुभेच्छा – Marathi Rajbhasha Din

संत ज्ञानेश्वरांनी मराठीला ब्रम्हविद्येचा दर्जा दिला आहे . . . ज्ञानदेव म्हणतात . . .

इये मऱ्हाटिचीये नगरी ब्रम्ह विद्येचा सुकाळु करी . . . .

ज्ञानेश्वरांनी मराठी ला शब्दब्रम्ह देखील म्हंटलेले आपल्याला आढळते . . . यावरून मराठीचे सामर्थ्य या भाषेची महत्ता तिची यथार्थता या 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने प्रकर्षाने जाणवते.

27 फेब्रुवारी हा कवि कुसुमाग्रजांचा जन्मदिन. साहित्यिक, कवी, नाटककार असलेल्या कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला आणि त्यांचे निधन 10 मार्च 1999 ला नाशिक येथे झाले.

ज्ञानपिठ पुरस्कार विजेता असलेले हे व्यक्तिमत्व मुळात नाशिकचे! मराठीतील त्यांच्या अमुल्य योगदानाला स्मरत त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो ही केवढी आनंदाची गोष्ट !!!

भारतभरात आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि जातीधर्माप्रमाणे भाषा बोलल्या जात असल्या तरी देखील माझ्या मराठी भाषेत जो गोडवा सामावलेला आहे त्याची सर इतर कुठल्याही भाषेला नाही . . . .

काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार या सर्वांचा साज लेऊन मराठी पुढे येते त्यावेळी तिचे सौंदर्य काय वर्णावे?

तिला उच्चारतांना ऐकणाऱ्याच्या कानाला आणि मनाला ज्या आनंदाची अनुभुती मिळते तिचे वर्णन केवळ अवर्णनीय असेच . . . . .

भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथे वास्तव्याला असणाऱ्यांची ती अधिकृत बोलीभाषा आहे.

कुसुमाग्रजांना बालपणापासुनच लिहीण्याची आवड होती त्यांनी लिहीलेल्या कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता, ललित वाड्मय या नावाजलेल्या साहित्य रचना रसिकांना कायम मंत्रमुग्ध करीत राहील्या.

त्यांच्या साहित्यातील अतुलनीय योगदानाकरता 1974 साली त्यांच्या ’नटसम्राट’ या नाटकाकरीता त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुढे 1987 ला सर्वोच्च असा ’ज्ञानपीठ पुरस्कार’ व 1991 ला भारत सरकारनं “पद्मभुषण” देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.

27 फेब्रुवारी कवि कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्याची कल्पना नितांत सुंदर अशीच आहे. वि.वा. शिरवाडकरांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला (ज्ञानपिठ पुरस्कार भारतिय साहित्य जगतामधे नोबेल पारितोषिका एवढाच महत्वाचा पुरस्कार समजल्या जातो). पुढे शासनाने त्यांचा जन्मदिन गौरव दिन म्हणुन साजरा करण्याचे जाहिर केले. जागतिक मराठी अकादमीने या करीता पुढाकार घेतला होता.

कवि कुसुमाग्रज म्हणतात

रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी

मराठी भाषेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी – Importance of Marathi Language in Marathi

 • आपली मराठी भाषा अतिशय श्रीमंत भाषा असुन साहित्याची आणि इतिहासाची या भाषेला किनार आहे.
 • मराठी भाषा संतांच्या अभंगांनी किर्तनांनी भजन आणि भारूडांनी सजलेली आहे.
 • छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे रक्षण केले.
 • 27 फेब्रुवारी या दिनाला अनेक नावांनी संबोधले जाते. जसे ’मराठी भाषा गौरव दिन’ ’मायबोली मराठी भाषा दिन’ ’जागतिक मराठी राजभाषा दिन’.
 • वि.वा. शिरवाडकरांच्या स्वांतंत्र्यपुर्व सुरू होणाऱ्या प्रदिर्घ अश्या पाच दशकांच्या कालखंडात तीन कादंबऱ्या, 16 खंडाची कविता, लघुकथांचे आठ खंड, निबंधाचे सात खंड, अठरा नाटकं, व सहा एकांकिका त्यांनी लिहील्या.
 • 1942 मधे ’’विशाखा’’ या कुसुमाग्रजांच्या ग्रंथाने तर तरूण पिढीला स्वातंत्र्य चळवळीकरीता प्रेरीत केले. आज देखील भारतिय साहित्यातील उत्कृष्ट ग्रंथ म्हणुन याला ओळखले जाते.
 • वि.वा. शिरवाडकरांना साहित्याचा मानंदड म्हणुन ओळखल्या जाते.
 • 1964 साली गोवा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 • वि.वा. शिरवाडकरांची दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट ही मराठी नाटकं अतिशय गाजली.
 • नटसम्राट या कुसुमाग्रजांच्या नाटकावर आधारीत महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट देखील निघाला.
 • ज्यात आप्पासाहेब बेलवलकरांची भुमिका नाना पाटेकर या मराठीतील दिग्गज अभिनेत्याने साकारलीये.
 • 1974 साली नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
  कुसुमाग्रजांच्या वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तिरावर या तीन कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या.
 • कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान एवढे अमुल्य आहे की 27 फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिना व्यतिरीक्त मराठी राजभाषा दिन इतर कोणत्या दिवशी साजरा होउच शकला नसता!

मराठी भाषेला वाढविण्याची तिचे संवर्धन, जतन करण्याची जवाबदारी आपलीच आहे. इंग्रजीचा अट्टाहास न करता बालपणापासुन आपल्या पुढच्या पिढीवर आपण मराठीचे संस्कार करायला हवेत. तिचे महत्व, मराठीतील गोडवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा जेणेकरून ही मराठी अशीच बहरत, फुलत आणि दरवळत राहील तिचा सुगंध सर्वदुर पोहोचत राहील . . . .

मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top