पुरंदर किल्ला इतिहास

Purandar Fort Information in Marathi

“अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी

मध्ये वाहते कऱ्हा पुरंदर

शोभती शिवशाहीचा तुरा”

पुरंदर किल्ल्याचे इतिहासात असे सुंदर वर्णन केल्या गेल्याचे आपल्याला दिसते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला असल्याने या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात 11 जून 1665 ला इतिहासात प्रसिद्ध असलेला ‘पुरंदरचा तह’ झाला होता. या गडावर काही काळ पेशव्यांची राजधानी देखील होती.

पुरंदर हा किल्ला साधारण 1200 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. निजामशाहीतील मलिक अहमदने 1489 च्या आसपास हा किल्ला जिंकला. पुढे  आदिलशाहीत हा गड 1550 मध्ये आला, आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता ज्यावेळी फत्तेखानास पाठवले होते तेंव्हा महाराजांनी या पुरंदर किल्ल्यातून फत्तेखानाला लढा दिला आणि त्याचा पराजय केला.

पुरंदर किल्ला इतिहास – Purandar Fort Information in Marathi

Purandar Fort Information in Marathi
Purandar Fort Information in Marathi

पुरंदर किल्ल्याचा इतिहास – Purandar Fort History in Marathi

आदिलशहाने ई.स. 1649 ला शहाजीराजांना कैद केले, आणि याच दरम्यान शिवरायांनी आदिलशाहीतले अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते. त्यामुळे खवळलेल्या आदिलशाहने महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास धाडले. एकीकडे शहाजीराजे कैदेत आणि दुसरीकडे फत्तेखान युद्ध करण्यासाठी निघाल्याने स्वराज्यावर येऊ घातलेले संकट, अश्याने शिवाजी महाराजांकरता परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.

फत्तेखानास पराभूत करण्यासाठी यावेळी महाराजांनी पुरंदर किल्ल्याची निवड केली. पण गड त्या सुमारास महाराजांच्या ताब्यात नव्हता, पुरंदरवर तेंव्हा महादजी निळकंठराव यांचे वर्चस्व होते. त्यांच्यातील भाऊबंदकीचा फायदा उचलत शिवरायांनी किल्ल्यात प्रवेश मिळविला व पुरंदर च्या आश्रयाने फत्तेखानाला मराठ्यांनी तगडी झुंज देऊन हे युद्ध जिंकले.

या लढाईत महाराजांना मोठं यश मिळालं. पुढे 1655 साली नेताजी पालकर यांना महाराजांनी पुरंदर किल्ल्याचे सरनौबत म्हणून नियुक्त केले. सईबाईंच्या पोटी संभाजी राजांचा याच गडावर 14 मे 1657 ला जन्म झाला.

मुगल सरदार मिर्झाराजे जयसिंगने ई.स.1665 ला पुरंदर ला वेढा दिला, वज्रगडावर ताबा मिळवत खानाने पुरंदरवर हल्लाबोल केला, खानाने माचीवर ताबा मिळविल्याने त्याठिकाणी दिलेरखान आणि मुरारबाजींचे घनघोर युद्ध पेटले.

लढाई दरम्यान मुरारबाजी पडले आणि पुरंदरवर मोगलांनी ताबा मिळवला. ही वार्ता शिवरायांच्या कानी पडताच त्यांनी मिर्झाराजे जयसिंगाशी तहाची बोलणी सुरु केली व इतिहासातील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह 11 जून 1665 रोजी झाला. महाराजांना या तहात ठरल्याप्रमाणे 23 किल्ले मोगलांना सुपूर्द करावे लागले. हे किल्ले होते.

 • पुरंदर
 • कोंढाणा
 • प्रबळगड
 • लोहगड
 • तिकोना
 • तुंग
 • रुद्र्माळ
 • विसापूर
 • माहुली
 • रोहिडा
 • अंकोला
 • मानगड
 • नंगगड
 • खिरदुर्ग (सागरगड)
 • वसंतगड
 • मनरंजन
 • कर्नाळा
 • सोनगड
 • पळसगड
 • मार्गगड
 • भंडारगड
 • नरदुर्ग
 • कोहोज

निळोपंत मुजुमदार यांनी 8 मार्च 1670  ला पुरंदर पुन्हा स्वराज्यात आणला. संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर औरंगजेबाने कब्जा केला आणि त्याचे नाव ठेवले ‘आजमगढ’!

पुढे मोगलांशी भांडून मराठ्यांच्या वतीने शंकर नारायण सचिव यांनी पुरंदर परत मिळविला, त्यापश्चात छत्रपती शाहूंनी शके 1695 मधे पुरंदर पेशव्यांच्या हाती दिला. त्यानंतर कित्येक दिवस पुरंदर किल्ला पेशव्यांची राजधानी होती. याच ठिकाणी 1697 ला गंगाबाई पेशवेंना मुलगा झाला’सवाई माधवराव’. ई.स.1818 साली मात्र हा गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

पुरंदर किल्ल्यावर बघण्यासारखी ठिकाणं – Tourist Place on Purandar Fort

बिनी दरवाजा:

पुरंदर माचीवरचा हा दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाता वेळी लागतो. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पुरंदरच्या खंदकड्याकडे आपले लक्ष वेधले जाते. आत गेल्यावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले आहेत. थोडं आणखीन पुढे गेल्यावर पुरंदरेश्वर मंदिर नजरेस पडतं.

पुरंदरेश्वर मंदिर:

शंकराचे हे मंदिर असून या देवळात इंद्रदेवतेची दीड फुटाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

रामेश्वर मंदिर:

पेशव्यांचे मूळ मंदिर असून पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस हे मंदिर आहे.

दिल्ली दरवाजा:

हा उत्तरेकडील दरवाजा आहे, पुढे लक्ष्मी देवीचे मंदिर आहे

पद्मावती तळे:

मुरारबाजी यांच्या पुतळ्या जवळून पुढे गेल्यावर हे तळ पहायला  मिळतं.

पुरंदर माची:

दिल्ली दरवाज्यातून थेट पुढे आल्यावर आपण पुरंदर माचीवर येतो.

खंदकडा:

दिल्ली दरवाज्यातून आत गेल्या नंतर एक कडा डाव्या बाजूने पूर्व दिशेकडे गेलेला दिसतो, तोच हा खंदकडा. आजूबाजुला पाण्याची काही टाकी असून अंबरखान्याचे अवशेष देखील आहेत.

शेंद्र्या बुरुज:

पद्मावती तळ्यामागे तटबंदीच्या बरोबरीने हा बुरुज बांधण्यात आला असून त्याला शेंद्र्या बुरुज असे नाव दिल्या गेले आहे.

केदारेश्वर मंदिर:

पुरंदर किल्ल्यावरचे मूळ दैवत असून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात.

भैरवगड:

या खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी रस्ता असून या ठिकाणी शिवरायांचा पुतळा पहायला मिळतो.

वीर मुरारबाजी:

बिनी दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजव्या दिशेला मुरारबाजी यांचा पुतळा असून तो आजही त्यांच्या शौर्याची गाथा सांगत उभा आहे. हा पुतळा या किल्ल्यावर ई.स. 1970 साली उभारण्यात आलाय.

पुरंदर व वज्रगड हे एकाच डोंगरावर वसले असले तरीही दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

पुरंदर किल्ला कसे जाल – How to Reach Purandar Fort

पुण्याहून साधारण 30 की.मी. अंतरावर सासवड गांव असून पुरंदर ला जाण्यासाठी या गावी यावे लागेल.

सासवड येथून नारायणपूर मार्गे पुरंदर किल्ल्यावर जाता येतं.

किल्ल्यापर्यंत वाहनाचा रस्ता असून वाहनाने आणि पायी देखील पुरंदर किल्ल्यावरील बिनी दरवाजा गाठता येईल.

पुरंदर किल्ल्यावर राहण्याची सोय – Hotels on Purandar Fort

किल्ल्यावर लष्कराचे बंगले असून तेथे राहण्याची सोय होऊ शकते. पण त्यासाठी सोबत ओळखपत्र अवश्य बाळगावे. गडावर खाण्या-पिण्याची सोय नाही परंतु सोबत आणलेले डबे केदारेश्वर मंदिरात निवांत आणि निसर्गरम्य वातावरणात खाण्यासाठी सुंदर वातावरण आहे. सहल म्हणून एकत्र येऊन आनंद उपभोगण्यासाठी पुरंदर किल्ला एक उत्तम ठिकाण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top