महाराष्ट्राचे महान संत “संत चोखामेळा” यांचा जीवनपरिचय

Sant Chokhamela Information in Marathi

“तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ…तारिले पतित तेणे किती”

जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या संताविषयी असे गौरवोद्गार काढले त्या संतांनी कित्येक पतितांना तारलं आणि कित्येक उपेक्षितांची कैफियत परमेश्वरापुढे मांडली ते संत चोखोबा 13 व्या शतकातील एक महान संत होते. त्यांचे गुरु संत शिरोमणी नामदेव महाराज.

चोखोबा एक संसारी पुरुष. पोटापाण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करता ते मोलमजुरी करीत असत. पण कर्तव्य बजावत असतांना ओठावर सतत सावळ्या पांडुरंगाचे नाव असे. आपल्या आसपास पसरलेल्या स्पृश्य अस्पृश्यतेच्या वातावरणात त्यांचा जीव कोंडला होता, गरिबी, दारिद्र्य, आणि त्यामुळे आलेलं नैराश्य यामुळे ते अस्वस्थ होते.

विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन इतरांप्रमाणे त्याला भेटावं असं त्यांना मनोमन फार वाटे पण समाजात पसरलेल्या जातिभेदाच्या खोल दरीमुळे ती खंत त्यांच्या मनात होती. पण साक्षात परमेश्वर त्यांना भेटला. संतसंगत लाभल्याने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला.

महाराष्ट्राचे महान संत “संत चोखामेळा” यांचा जीवनपरिचय – Sant Chokhamela Information in Marathi

Sant Chokhamela Information in Marathi
Sant Chokhamela Information in Marathi

संत चोखामेळा यांचा संक्षिप्त परिचय – Sant Chokhamela in Marathi

नाव (Name) संत चोखामेळा
जन्म (Birth Date)  निश्चित नोंद नाही
मृत्यू (Death) ई.स. 1338  मंगळवेढा
पत्नी (Wife) सोयराबाई
मुलगा (Child) कर्ममेळा

संत चोखामेळा याचे जीवन – Sant Chokhamela Marathi Mahiti

संत चोखामेळा हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संत होते. त्यांचे अवघे कुटुंबच विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. संत चोखोबांचा विवेक दीप हा ग्रंथ फार प्रसिद्ध असून त्यांनी अनेक अभंग देखील रचले आहेत.

“ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा

काय भुललासी वरलीया रंगा

चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा

काय भुललासी वरलीया सोंगा”

संत चोखोबा यादव काळातील संत नामदेव महाराजांच्या संतमेळ्यातील संतकवी. काहींच्या मते चोखोबांचा जन्म पंढरपूर येथे झाला तर काही तज्ञ चोखामेळा मुळात वऱ्हाडातले (विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा हे गाव) असल्याचे देखील मानतात. ते जातीने महार होते त्यामुळे धर्मक्षेत्रात त्यांचा बराच छळ झाला.

तत्कालीन समाजाकडून मिळालेल्या हीन वागणुकी पश्चात देखील चोखोबा स्वच्छ आणि निर्मळ होते. त्यांच्या अभंगांचे वलोकन केल्यास आपल्या लक्षात येतं की त्यांची वाणी, व्याकरण, शब्दरचना, विवेचन अत्यंत चोख आणि स्पष्ट आहे.

वाणी नाही शुद्ध धड न ये वचन”

असं एका अभंगात संत चोखोबा म्हणतात, पण ही त्यांच्यातील विनम्रता आहे. सामाजिक आशयाचे भान, उत्कटता, विवेचन यामुळे त्यांच्या अभंगांना मराठी सारस्वतात विशेष मान मिळालेला आढळून येतो. ई.स. 1338 सालातली गोष्ट, मंगळवेढा येथे किल्ल्याच्या बांधकामा वेळी पूर्व दिशेकडील वेशीचे काम सुरु होते.

“मंगळवेढ्या भोवती कुसू बांधावया महाराशी बोलवण्या दूत आले

महारा समागमे चोखामेळा आला काम ही लागला करावया”

संत चोखामेळा यांच्या अभंगात आपल्याला या प्रसंगाचा पुरावा देखील आढळतो. त्यावेळी ते बांधकाम अचानक कोसळले आणि त्या खाली संत चोखोबा आणि अनेक मजूर गाडल्या गेले. काही काळानंतर संत नामदेव महाराज मंगळवेढा येथे आले, बांधकाम कोसळलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठलअसा ध्वनी ऐकू येत होता त्या अस्थी संत चोखोबांच्या आहेत हे ओळखलं आणि त्या अस्थी घेऊन ते पंढरपूरला आले. विठ्ठल मंदिराच्या बाहेर संत नामदेवांच्या पायरीसमोर संत चोखामेळा यांचे समाधीस्थान बांधण्यात आले आहे.

संत नामदेव महाराज म्हणतात: 

“चोखा माझा जीव चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा

काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मोही आलो व्यक्ती तयासाठी

माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान तया कधी विघ्न पडो नदी

नामदेवे अस्थी आणिल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबर”

संत चोखामेळा यांच्या अस्थी मंगळवेढा येथून पंढरपूर येथे घेऊन जात असतांना संत नामदेव महाराज यांनी 2 मैलांवर आणि 10 मैलांवर थोडी विश्रांती घेतली होती. पुढे भक्तांनी त्या ठिकाणी संत चोखोबांचे स्मरण म्हणून पादुकांची स्थापना केली. आषाढी वारी दरम्यान आज देखील वारकरी त्या पादुकांवर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत.

संत चोखोबा हे कार्यमग्न असतांना सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असत  संत चोखामेळा यांना कायम हीन कामे करावी लागायची. असं म्हणतात की जे काम करतांना चोखोबा दमून जायचे ते कार्य स्वतः पांडुरंग येऊन उत्साहाने पूर्ण करायचे. संत चोखोबांनी समाजबांधवाना आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचा संदेश दिला आहे. 

त्यांच्या अभंगातून त्यांचे भावविश्व ओळखण्याचा प्रयत्न केला तर व्यक्त न करता आलेला एक मूक आक्रोश अनुभवायला मिळतो… तो देखील संस्कारांनी ओतप्रोत आणि संवेदनांनी भरलेला.

“चंदनाच्या संगे बोरिया बाभळी

हेकळी टाकळी चंदनाची

संताचिया संगे अभाविक जन

तयाच्या दर्शने तेची होती

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा

नाही तरी भार वहावा खरा ऐसा”

संत चोखामेळा यांच्या जीवनावर कादंबरी – Book on Sant Chokhamela

अरुणा ढेरे या सुप्रसिद्ध लेखिकेने संत चोखामेळा यांच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिली आहे.

संत चोखामेळा यांच्या जीवनावर चित्रपट – Sant Chokhamela Movie

“जोहार मायबाप” नावाचा मराठी चित्रपट 1950 साली प्रदर्शित झाला होता. संत चोखामेळा यांच्या जीवनावरील या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते. संगीतकार सुधीर फडके तर कथा-पटकथा आणि संवाद ग.दि. माडगुळकर  यांचे होते.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here