उमाजी नाईक

Umaji Naik Mahiti

भारताच्या स्वातंत्र्य लढयात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्या ज्या वेळी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळी या हुतात्म्यांशिवाय या देशाचा इतिहास अपूर्णच आहे.

या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली 1857 च्या उठावाने, पण त्या आधीही इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याचा उठाव झाला होता तो म्हणजे १९ व्या शतकाच्या प्रारंभी….! आणि या उठावाचे नेतृत्व केले होते उमाजी नाईक यांनी. हा उठाव इतिहासात रामोशींचा उठाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच उमाजी नाईक यांना अद्यक्रांतीकारक असेही म्हणतात.

उमाजी नाईक – Umaji Naik Information in Marathi

पूर्ण नाव: उमाजी नाईक
जन्म (Birthday) ७ सप्टेबर १७९१
जन्मस्थान  पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर)
मृत्यु (Death) ३ फेब्रुवारी १८३४

उमाजी नाईक यांची थोडक्यात महिती – Umaji Naik History in Marathi

उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. उमाजी नाईक यांच्या वडिलांकडे किल्ले पुरंदरची वतनदारी होती. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची वतनदारी, रखवाली हि रामोशी समाजाकडेच होती. त्यांचे वडील दादजी खोमणे यांच्या कडून तीर कमठा मारणे, भाला फेकणे, गोफण चालविणे, कुऱ्हाड, दानपट्टा, तलवार चालविण्याचे कौशल्ये आत्मसात करून घेतली.

ज्यावेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी उमाजी ११ वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्युनंतर वंश परंपरेने किल्ल्याची वतनदारी त्यांच्याकडे आली.

१८०३ मध्ये जेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांच्या सल्ल्यावरून रामोशींकडून पुरंदर किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामोशींनी त्याला विरोध केला. आणि त्यावेळी संतापलेल्या पेशव्यांनी रामोशिंकडून त्यांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या त्यांच्या कडून किल्ल्याच्या संरक्षणाचे काम काढून घेतले आणि तेथे आपल्या मर्जीतील लोकं ठेवले.

त्यामुळे रामोशी समाजाकडे कुठलेच काम न राहिल्यामुळे हा समाज उघड्यावर आला. त्याचवेळी उमाजींनी शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन ‘स्वराज्य पुन्हा परत आणेन’ अशी गर्जना केली. आणि येथूनच या संग्रामाला सुरुवात झाली. त्यांनी परिसरातील सर्व रामोशींना संघटीत करून इंग्रजी सत्तेविरोधात बंडाचे निशाण फडकावले. उमाजींचा भाऊ आमृता यांच्या सोबत त्यांनी १८२४ मध्ये भाम्बुर्डा येथे असलेला इग्रजांचा लष्करी खजिना लुटला. या लुटीत उमजींची भूमिका फार महत्वाची होती.

इंग्रंजांचा जाहीरनामा –

आता इंग्रजांकडे उमाजींविरोधात तक्रारींचा ओघ वाढतच चालला होता आणि याचाच परिणाम म्हणून इग्रजांनी २८ ऑक्टोबर १८२६ रोजी उमाजींविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यामध्ये उमाजी व त्यांच्या साथीदारांना पकडून देणाऱ्यास १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आणि नंतर तर उमाजींना साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल असे जाहीर केले. पण उमाजींनी प्रजेचे हित जोपासत इंग्रजांविरुद्ध आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या. ८ ऑगस्ट १८२७ रोजी इंग्रजांनी परत एक जाहीरनामा काढत उमाजींना पकडून आणून देणाऱ्यास १२०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

त्यानंतरही उमाजींनी मात्र थेट पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसनकडे आपल्या मागण्या ठेवल्या आणि मागण्या मान्य न झाल्यास रोमोश्यांच्या उठावास सोमोरे जावे लागेल अशी धमकीही दिली. या प्रकरणामुळे इंग्रज चवताळले आणि त्यांनी उमाजींवर ५००० रुपयांचे बक्षीस ठेवले. तरीही उमाजींना पकडण्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर इग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.

उमाजी नाईक यांनी काढला जाहीरनामा – 

उमाजींनी १६ फेब्रुवारी १८३१ ला एक जाहीरनामा काढला कि युरोपिअन दिसताच त्याला ठार मारावे, ज्यांची वतने, तनखे इंग्रजांनी बंद केले आहेत अशा रयतेने आम्हाला साथ द्यावी इतकेच काय तर गावांनी इग्राजांना महसूल देणे बंद करावे असेही या जाहीरनाम्यात नमूद केले. त्यादरम्यान उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

अखेर उमाजींना पकडण्यात इंग्रजांना यश-

८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढला त्यात त्यांना पकडून आणून देणाऱ्यास १०००० रुपये व ४०० बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्यात येईल. आणि याच अमिषाला त्यांचे काळू व नाना हे बळी पडले व त्यांनी १५ डिसेंबर १८३१ ला उमाजींना पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ३ फेब्रुवारी १८३४ रोजी उमाजींना पुणे येथे फाशी देण्यात आली. सलग १४ वर्षे इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारा हा आद्य क्रांतीकारक काळाच्या पडद्याआड गेला.

इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम त्यांनी पुकारलेले बंड हे पुढील क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले. अशा ह्या आद्य क्रांतिकारकाचे नाव इतिहासात आदराने घेतले जाते.

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Umaji Naik

प्र. १. आद्य क्रांतिकारक कुणास म्हटले जाते?

उ. उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्या जाते.

प्र. २. उमाजी नाईक यांच्या वडिलांकडे कोणत्या किल्ल्याची वतनदारी होती?

उ. पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदरची वतनदारी उमाजींच्या वडिलांकडे होती.

प्र. ३. इंग्रजांच्या सल्ल्यावरून पुरंदर किल्ल्याची वतनदारी रामोशींकडून कोणी काढून घेतली?

उ. दुसरा बाजीराव पेशव्याने.

प्र. ४. उमाजींना केव्हा फाशी देण्यात आली.

उ. उमाजींना ३ फेब्रुवारी १८३४ रोजी पुणे येथे फाशी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here