धुळे जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Dhule Jilha Mahiti

खांन्देश म्हंटलं की आठवतात ते जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे तिन जिल्हे !

तिथली अहिराणी भाषा . . . . . तिथला आदिवासी समाज . . . तेथील लोककला . . . परंपरा . . . . पारंपारीक लोकनृत्य . . . खानपानाच्या संस्कृती आणि बरच काही !

याच परंपरांना जोपासत पुढे नेणारा . . . तव्दतच नाविण्याची कास धरलेला धुळे जिल्हा !

उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा धुळे पुर्वीचा पश्चिम खान्देश म्हणजे आजचा हा धुळे जिल्हा !सातपुडा डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेला हा जिल्हा. जिल्हयाच्या पश्चिमेला सहयाद्रिच्या पर्वतरांगा पोहोचलेल्या आहेत. थोडया दुर अंतरावर गाळणा डोंगराच्या टेकडया देखील पहायला मिळतात.धुळे शहर पांझरा नदीच्या तिरावर वसले आहे.

या शहराची योजना ’भारतरत्न’ श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याव्दारे करण्यात आली होती.

धुळयात शहाजहान ने 1630 साली केलेल्या स्वारी दरम्यान शाही जामा मस्जिद (खुनी मस्जिद) ची निर्मीती केली.

आदिशक्ती एकविरा देवी मंदिर या ठिकाणी फार प्रसीध्द आहे.

शिवाय हिंदु मुस्लिम एैक्याचे प्रतीक ठरलेली अजांनशाह वली रहे दरगाह हे पवित्र ठिकाण देखील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

येणाऱ्या काळात जिल्हयातील साक्री तालुक्यात जगातील सगळयात मोठा सौर उर्जा प्रकल्प आकाराला येत आहे आणि त्यामुळे धुळे जिल्हयाचं नाव जगाच्या नकाशावर यायला मोठी मदत होईल.

अपारंपारीक उर्जेचा हा सौर उर्जा प्रकल्प असल्याने त्यामुळे कुठलीही नैसर्गिक हानी होणार नाही आणि या उर्जेचा जास्तीत जास्त वापर होउन पर्यावरणाच्या संवर्धनाकरता मोलाची मदत होईल.

धुळे जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Dhule District Information in Marathi

Dhule District

धुळे जिल्हयातील तालुके – Dhule District Taluka List

या जिल्हयात एकुण 4 तालुके आहेत.

 1. धुळे
 2. साक्री
 3. शिंदखेडा
 4. शिरपुर

धुळे जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Dhule Jilha Chi Mahiti

 • लोकसंख्या 20,50,862
 • एकुण क्षेत्रफळ 7,195 वर्ग कि.मी.
 • तालुके 4
 • एकुण गावं 678
 • साक्षरतेचे प्रमाण 71.6ः 1000
 • पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 944
 • राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 क्र. 6 क्र. 211 या जिल्हयातुन गेले आहेत. या शहरातुन महत्वाचे मुंबई, आग्रानागपुर, सुरत आणि धुळे, सोलापुर हे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत.

या जिल्हयात मुख्यतः मराठी आणि अहिराणी भाषा बोलली जाते (अहिराणी ही बोली ऐकायला फार गोड भाषा आहे शिवाय त्या भाषेला आपला असा विशिष्ट हेल आहे जो ऐकायला श्रवणीय वाटतो).

या जिल्हयातुन पांझरा, अरूणावती, तापी, अमरावती, बुराई, अनेर, बोरी, कान या नद्या वाहातात.

तापी ही मुख्य नदी या जिल्हयातुन वाहाते, पण ती खळाळुन वाहाते ती केवळ पावसाळयातच पाण्याचा अभाव जाणवत असल्याने या भागातील शेतकरी बांधव मोठया प्रमाणात कोरडवाहु शेतीवर अवलंबुन आहेत.

बाजरी, कापुस, भुईमुग, ज्वारी, मका आणि सोयाबीन ही येथील महत्वाची पिकं, मात्र याच जिल्हयातल्या साक्री तालुक्यात पश्चिमपट्टयात शेतकरी बांधव आपल्याला भात पिक घेतांना दिसुन येतात.

Dhule Jilha Mahiti

कापुस, मिरची ऊस, केळी ही महत्वाची नगदी पिकं धुळे जिल्हयात घेण्यात येतात.

धुळे जिल्हा मिरची उत्पादनाकरता आणि बाजारपेठे करता देखील प्रसिध्द आहे.

या जिल्हयातील दोंडाईचा हे आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असे गांव आहे की या गावात मक्यापासुन ग्लुकोज (साखर) आणि इतर पदार्थ बनवले जातात.

धुळे जिल्हा शुध्द दुधाकरता देखील चांगलाच प्रसिध्द आहे असं म्हणतात की एकेकाळी दिल्ली शहरातील नागरिक धुळे जिल्हयातुन येणाऱ्या दुधाची वाट पाहायचे.

नंदुरबार हा जिल्हा 1 जुलै 1998 ला धुळे जिल्हयातुन विभाजन होवुन अस्तित्वात आला किर्तन, लोकनाट (तमाशा), टिपरी नृत्य, दसपावली अश्याा लोककला प्रसिध्द आहेत.

आज काळाच्या ओघात आणि वेगवान जीवनात देखील धुळे जिल्हयात अनेक जुन्या लोककला येथील लोक जोपासतांना दिसुन येतात.

शहरापासुन नजिक असलेल्या नरडाणा, अवधान या शिंदखेडा तालुक्यातल्या गावांमधे औद्योगिक वसाहत वसलेली आपल्याला दिसते.

या ठिकाणी कापड उद्योग मोठया प्रमाणात आहे.

धुळे जिल्हयातुन सर्वदुर रेल्वेसेवा जरी पोहोचली नसली तरी देखील धुळे.चाळीसगांव दरम्यान रेल्वे सेवा आहे आणि भुसावळ.सुरत हा लोहमार्ग धुळे जिल्हयातुन गेलेला आहे. धुळे शहर बस आणि खाजगी वाहनाने देखील चांगल्या तऱ्हेने जोडल्या गेले आहे.

पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places to Visit in Dhule

 • अनेर चे धरण आणि अभयारण्य.
 • शिरपुर तालुक्यातील हे ठिकाण असुन अनेर नदीवर धरण बांधण्यात आले आहे.
 • हा संपुर्ण परिसरच अत्यंत हिरवागार आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आपल्याला पहायला मिळतो.
 • या परिसरात धरणाजवळच साधारणतः 83 वर्ग कि.मी. विस्तीर्ण अश्या परिसरात अनेर अभयारण्य हे अनेक पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे.
 • या परिसरात पर्यटनाकरता आल्यास अनेक पशु पक्ष्यांचे दर्शन आपल्याला घडते, अस्वल, रानडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, भेकर, ससा या प्राण्यांसह गिधाड, तितर बटेर, मैना, सायाळ, सुतारपक्षी, पाणकोंबडे, हाॅर्नबिल, बगळे असे पक्षी आपल्या दृष्टीस पडतात.
 • संपुर्ण दिवस या अभयारण्यात कसा निघुन जातो ते कळत देखील नाही.
 • शहरी वातावरणाला कंटाळलेले जीव निखळ आनंदाच्या शोधात या ठिकाणी भेट द्यायला येतात.

ऐतिहासीक किल्ले – Forts in Dhule District

 • धुळे जिल्हयात अनेक ऐतिहासीक किल्ले त्याच्या प्राचीन अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देत आजही उभे आहेत.  या जिल्हयात साधारणतः ’क’ वर्गीय 376 पर्यटनाची ठिकाणं अस्तित्वात आहेत.
 • किल्ल्यांविषयी बोलायचे झाल्यास धुळे तालुक्यात लळिंग आणि सोनगिर येथे, साक्री तालुक्यात भामेर येथे आणि शिरपुर तालुक्यातील थाळनेर येथे ऐतिहासीक असे उंच डोंगरी आणि भुईकोट किल्ले इतिहास प्रेमींना खुणावतात.
 • धुळे तालुक्यातील लळिंग येथे किल्ल्याव्यतिरीक्त कुरण येथे धबधबा देखील आहे पावसाळयात तर या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्याकरता पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
 • साक्रीचा आमळी येथील अलालदरीचा धबधबा देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

राजवाडे वस्तुसंग्रहालय (राजवाडे संशोधन मंडळ).

 • धुळे शहरात राजवाडे वस्तुसंग्रहालय असुन इतिहासप्रेमी आणि जुन्या काळातील वस्तु पाहाण्याचे आकर्षण असणा.या पर्यटकांकरता हे ठिकाण नक्कीच ’न’ चुकवण्यासारखे!
 • श्री विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे थोर इतिहासकार होउन गेले त्यांनी पांडुलिपीचा विशाल संग्रह केला.
 • ऐतिहासीक दस्तऐवज, पुस्तकं सुरक्षीत करण्याकरता त्याचे जतन करण्याकरता आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करण्याकरता या संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
 • या ईमारतीचे उद्घाटन त्याकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 • या संग्रहालयात जुनी हत्यारे, कलाकृती, पुर्वी वापरात असणारे शिक्के, तांब्याची भांडी, तलवार, बंदुक, वेगवेगळया धातुच्या मुर्ती, आदि बऱ्याच पुरातन वस्तु जतन करून या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
 • हे वस्तुसंग्रहालय पहायचे झाल्यास सकाळी 8.30 ते 11.00 आणि सायंकाळी 4.30 ते 8.00 अशी वेळ निर्धारीत करण्यात आली आहे .

या सर्व पर्यटनस्थळां व्यतिरीक्तअक्कलपाडा धरण, सोनवाड धरण, वाग्देवता मंदिर (या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींचे साहित्य आजही जतन करून ठेवले आहे), शिरपुर येथील श्री बालाजी मंदिर, नकाणे तलाव, बिजासन देवीचे मंदिर, एकवीरा देविचे मंदिर, पेढकाई देवी मंदिर आणि क्रांतीस्मारक (साळवे), नगांवचे श्रीदत्त मंदिर ही ठिकाणं पाहाण्यासारखी आहेत.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here