महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी माहिती

Maharashtratil Thand Haveche Thikan

मंडळी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात पावसाळयात फिरण्याकरता माळशेज घाट, आंबोली, इगतपुरी, लोणावळा, माथेरान ही ठिकाणं प्रसिध्द आहेत, त्याचप्रमाणे थंड हवेची सुप्रसीध्द ठिकाणं देखील महाराष्ट्रात आहेत आणि या ठिकाणी थंड आणि अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्याकरता हजारो पर्यटक दरवर्षी येथे गर्दी करतात.

तुम्ही जर फिरण्याकरता थंड हवेची ठिकाणं शोधत असाल तर मग तयार व्हा! या लेखात जाणुन घ्या कोणती आहेत महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेची ठिकाणं….

महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी माहिती – Hill Station In Maharashtra

Hill Station in Maharashtra

महाराष्ट्रातील ५ थंड हवेची ठिकाणं – Top 5 Hill Station In Maharashtra

  • खंडाळा – Khandala

आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या सहयाद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत त्याच रांगांमध्ये पश्चिम घाटात खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण हे लोणावळयापासुन अगदी जवळ म्हणजे ३ कि.मी अंतरावर व कर्जतपासुन ७ कि.मी. अंतरावर आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना एकमेकांशी जोडणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वतरांगां मधला बोर घाट ज्याठिकाणी संपतो तेथे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

दक्षिणेला सहयाद्री पर्वताचा उंच डोंगर आणि उत्तरेला खोल दरी यांच्या अगदी मध्यभागी खंडाळा हे हिल स्टेशन वसलेले आहे

ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे अश्यांकरता हे ठिकाण योग्य असा पर्याय आहे. पुणे आणि मुंबईतील तरूण मंडळी येथे भरपुर मोठया प्रमाणात ट्रेकिंगचा आनंद घेण्याकरता येत असतात.

खंडाळा येथील सनसेट पॉईंट, भुशी लेक, अमृतांजन पॉईंट, टायगर लीप (वाघदरी), कार्ला भाजा लेणी, मंकी हिल, ही ठिकाणं फिरण्याकरता आणि पर्यटनाचा आनंद घेण्याकरता प्रसिध्द ठिकाणं आहेत.

खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणी तसे पाहाता १२ ही महीने गर्दी असते पण विशेषतः उन्हाळयात पर्यटक थंड आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्याकरता येथे जास्त गर्दी करत असल्याचे पहायला मिळते.

गुलाम चित्रपटात आमिर खान राणी मुखर्जीला विचारतो ’’आती क्या खंडाला?’’ आणि तेव्हांपासुन राणी मुखर्जीला खंडाला गर्ल म्हणुन नाव पडले आणि त्याचप्रमाणे खंडाळा हे हिलस्टेशन अधिकच प्रकाशझोतात आले… या गितामुळे या ठिकाणाची चांगलीच प्रसिध्दी झाली आणि येणाऱ्या पर्यटकांची गर्दी देखील वाढली.

येथे येण्याकरता पुण्याहुन आणि मुंबईवरून देखील भरपुर पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय खाजगी वाहनाने देखील येथे येणे सोयीचे होते.

तेव्हां मंडळी जर आपण थंड हवेच्या शोधात असाल, ट्रेकिंग ची आवड असेल, आणि जर खंडाळा अजुन पाहिले नसेल तर अजिबात वेळ न गमावता बॅग भरून खंडाळयाची वाट धरा.

  • चिखलदरा – Chikhaldara

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ प्रांतातील “विदर्भाचे नंदनवन’’ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील थंड हवा आणि थंड वातावरण सुध्दा फार प्रसिध्द आहे.

अमरावती जिल्हयातील सातपुडा पर्वतरांगां मधले हे थंड हवेचे ठिकाण साधारण १११८ मीटर उंचीवर वसलेले आहे .

महाभारताच्या काळात पांडव या ठिकाणी वास्तव्याला होते असे सांगीतल्या जाते. भीमाने ज्यावेळी किचकाचा वध केला त्यावेळी त्याला खोल दरीत फेकुन दिले त्यावेळी या भागाला किचकदरा म्हंटल्या जाऊ लागले आणि पुढे या ’किचकदरा’चा अपभ्रंश होउन ’’चिखलदरा ’ असे नाव पडले जे आजपर्यंत कायम आहे.

या ठिकाणच्या परिसरात कॉफीचे उत्पादन घेतले जाते. साग, बांबु आणि मोहाची भरपुर झाड येथील जंगलात आढळतात या जंगलाला मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागुन आहेत.

काय पहाल – What do you see

पंचबोल पाँइंट, भीमकुंड, देवी पॉईंट, मंकी पॉईंट, लेन पॉईंट, हरिकेन पॉईंट, नर्सरी गार्डन, आदिवासी वस्तु संग्रहालय, शिवमंदिर, शक्कर तलाव, चिखलदरा नजिक असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगडचा किल्ला ही सगळी ठिकाणं भेट देण्यासारखी आणि पाहाण्यासारखी आहेत.

कोरकू, गोंड, माडिया या जमातीचे आदिवासी लोक येथे मोठया संख्येने राहातात.

येथे आल्यानंतर आदिवासी संस्कृतिचा त्यांच्या परंपरा आणि उत्सवांचा आनंद पर्यटकांना घेता येतो.

कसे जाल – How To Go

चिखलदरा येथे येण्याकरता रेल्वेची सुविधा नाही. येथे येण्याकरता अमरावती आणि अकोला येथुन महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत शिवाय नागमोडी रस्त्यांचा आनंद घेत खाजगी वाहनाने देखील येथे येणे सोयीचे आहे.

  • महाबळेश्वर – Mahabaleshwar

महाराष्ट्रातील पर्यटकांचे आवडते आणि विशेषतः नविन लग्न झालेल्या जोडप्यांचे फिरायला येण्याचे थंड हवेचे सुप्रसिध्द ठिकाण म्हणजे महाबळेश्वर…

निसर्गदेवतेला पडलेलं सुंदर स्वप्नं अश्या शब्दांत बालकवींनी महाबळेश्वरचं वर्णन केलेलं आहे

पर्यटक येथे वर्षभर भेट देतात. पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेल्या महाबळेश्वरला ब्रिटीशांच्या काळापासुन उत्कृष्ट गिरीस्थान म्हणुन लाभलेला लौकीक आज देखील कायम आहे.

महाराष्ट्रात हिरवळीने सजलेली जी काही मोजकी ठिकाणं आहेत त्यापैकी महाबळेश्वर हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.

सातारा जिल्हयातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळयात मोठया प्रमाणात पाऊस पडतो. पावसाच्या दिवसांमध्ये हा संपुर्ण परिसर जलमय झालेला असतो.

महाराष्ट्रातील प्रसिध्द अश्या कृष्णा नदीचा उगम येथुन झाला आहे ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, व आंध्र प्रदेशातुन वाहते

या ठिकाणचे हवामान स्ट्रॉबेरी च्या उत्पादनासाठी अनुकुल असल्याने येथे मोठया प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते.

इतकेच नव्हें तर आपल्या भारत देशाच्या एकुण उत्पादनापैंकी जवळजवळ ८५ टक्के उत्पादन येथे घेण्यात येतं.

महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य अप्रतीम असे आहे लोणावळा खंडाळा माथेरानप्रमाणे येथील फिरता येणारे पाँइंटस् सुध्दा सुंदर आणि नजरेत भरून उरणारे आहेत.

महाबळेश्वरचा मध, गुलकंद, स्ट्रॉबेरी, रासबेरी, लाल मुळे, गाजरे फार प्रसिध्द आहेत.

काय पहाल – What do you see

महाबळेश्वर मंदिर, वेण्णा लेक (वेण्णा तलावात नौका विहाराची सोय आहे), आर्थर सीट पॉईंट, विल्सन पॉईंट, लॉन्डिंग पॉईंट, पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, प्रतापगड, लिंगमाला धबधबा, ही महाबळेश्वरची प्रसिध्द ठिकाणं असुन येथे पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी पहावयाला मिळते.

कसे जाल – How To Go

महाबळेश्वर या हिलस्टेशन नजिकचे रेल्वेस्टेशन म्हणजे सातारा हे ६० कि.मी. अंतरावर आहे.  पुण्यापासुन महाबळेश्वरचे अंतर १२० कि.मी. आणि मुंबईपासुन २७० कि.मी आहे.

पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापुर येथुन महाबळेश्वर ला येण्याकरता महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस सतत उपलब्ध आहे या व्यतिरीक्त खाजगी बसेस आणि खाजगी वाहनं देखील उपलब्ध आहेत.

तेंव्हा मंडळी भरगच्च वृक्षसंपदा, हिरवागार निसर्ग, श्वास रोखायला लावणाऱ्या दऱ्या, आकाशाला स्पर्श करू पाहाणारी पर्वतशिखरे अनुभवण्याकरता महाबळेश्वरला यायलाच हवे…

  • पाचगणी – Panchgani 

महाबळेश्वर प्रमाणेच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण देखील सातारा जिल्हयात आहे. ज्याप्रमाणे लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं जवळ जवळ आहेत त्याचप्रमाणे महाबळेश्वर आणि पाचगणी देखील अवघ्या १८ कि.मी. अंतरावर आहे.

थंड हवेचे हे ठिकाण प्रदुषणापासुन देखील दुर असल्याने येथील हवा आरोग्याकरता अत्यंत लाभदायक आहे.

पाचगणी हे हिल्स स्टेशन पब्लिक स्कुल्ससाठी फार प्रसिध्द आहे. फार पुर्वीच्या काळी पारशी बांधवांनी बांधलेले बंगले आजदेखील लक्ष वेधुन घेतात.

पाच डोंगरांचा समुह या ठिकाणी असल्याने याला पाचगणी हे नाव पडले असावे.

आरोग्यास लाभकारक हवामान आणि समृध्द निसर्ग हे पाचगणीचं आपलं असं वैशिष्टयं आहे.

पाचगणीच्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात चित्रपट निर्माते पडले नसते तरच नवल त्यामुळे कित्येक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी आजवर झालेले आहे.

पाचगणीच्या गुंफा, कमलगड, धबधबे, खोल दऱ्या, किडीज पार्क, टेबल लँड, ही प्रसिध्द आणि प्रेक्षणीय स्थळं पाचगणीच्या सौंदर्यात भर घालतात.

सातारा जिल्हयातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची पर्यटनाकरता असलेली उत्तम ठिकाणं सातारा जिल्हयाकरता अभिमानास्पद अशीच आहेत.

  • भिमाशंकर – Bhimashankar

थंड हवेच्या ठिकाणात पुणे जिल्हा सुध्दा मागे नाही बरं का!

पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील भिमाशंकर हे १२ ज्योर्तिलींगांपैकी एक ज्योर्तिलींग.

खेड पासुन ५० कि.मी. आणि पुण्यापासुन सुमारे ११० कि.मी. अंतरावर भिमाशंकर वसलेले आहे.

या ज्योर्तिलिंगामधुन पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख भीमा नदी उगम पावते. भीमा नदीचा उगम पाहाणे हा एक अविस्मरणीय आनंदाचा भाग आहे.

अतिशय घनदाट अरण्याने वेढलेला भाग असल्याने साहजिकच तो अत्यंत थंड आहे.

पर्यटन आणि ज्योर्तिलींगाचे दर्शन असा दुहेरी योग येथे येणाऱ्या पर्यटकाला प्राप्त होतो.

१९८४ साली या घनदाट अरण्याला अभयारण्य म्हणुन घोषीत करण्यात आले.

या जंगलात बिबटया, सांबर, रानडुक्कर, रानससा, रानमांजर, उदमांजर, असे अनेक प्राणी वास्तव्याला आहेत.

बिबटयाच्या संवर्धनाकरता वनविभागाने या ठिकाणी अनेक योजना राबविल्या आहेत.

परंतु येथील वैशिष्टयपुर्ण आणि सर्वात विशेष प्राणी म्हणजे शेकरू. (उडणारी खार) शेकरू ही खार तांबुस रंगाची असुन ती केवळ या भिमाशंकरच्या जंगलातच आढळते.

कोकणकडा, सीतारामबाबा आश्रम, गुप्त भीमाशंकर, नागफणी ही ठिकाण पाहाण्यासारखी आणि प्रत्यक्ष अनुभवण्या सारखी अशीच आहेत.

कोकण कडाची उंची ११०० मीटर इतकी उंच असुन हा कडा मंदिराजवळच आहे.

असे म्हणतात की वातावरण स्वच्छ असल्यास पश्चिमेकडचा अरबी समुद्र देखील येथुन दिसतो.

भीमानदीचा उगम हा येथील शिवलिंगातुन आहे पण येथुन ही नदी गुप्त होते आणि जंगलात मंदिरापासुन साधारण दिड कि.मी. अंतरावर पुन्हा प्रगटते त्यामुळे या जागेला गुप्त भिमाशंकर असे म्हंटल्या जाते.

पुण्यापासुन साधारण अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणाला खास करून ज्योर्तिलिंगाला भेट द्यावयास नक्कीच जायला हवे.

आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या काही ठिकाणांवर आपण फिरायला जाऊन तेथील आनंद घेऊ शकतो.

तर जीवनात अवश्य एकदा या ठिकाणांना भेट द्या,आपल्याला वेगळी अनुभूती आल्यासारखे जाणवेल.

आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायाला विसरू नका.

Thank You So Much And Keep Loving Us! 

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here